घर म्हटलं की कपडे, वस्तू आणि इतर सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा असणं गरजेचं असतं. मात्र, अनेकदा घर लहान असल्यामुळे मोठं कपाट ठेवणं शक्य होत नाही. अशावेळी कपडे कुठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः घरात सदस्य जास्त आणि कपड्यांची संख्या अधिक असेल तर अडचण वाढते. पण आता यासाठी नवीन कपाट खरेदी करण्याची गरज नाही. काही स्मार्ट आणि सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही कमी जागेतही कपडे व्यवस्थित ठेवू शकता. ६ भन्नाट पद्धती जाणून घेऊया.
घरात कपाट ठेवण्यासाठी जागा नसेल तर बेडखालील मोकळ्या जागेचा वापर करा. बाजारात वेगवेगळ्या आकारांचे स्टोरेज बॉक्स उपलब्ध असतात. त्यामध्ये तुम्ही रोज न वापरणारे कपडे, हिवाळ्यातील स्वेटर, चादरी आणि इतर वस्तू ठेवू शकता. झाकण असलेल्या बॉक्समध्ये कपडे ठेवल्यामुळे त्यावर धूळ साचत नाही. तसेच गरजेनुसार हे बॉक्स सहज बाहेर काढता येतात.
कमी जागेत जास्त कपडे ठेवण्यासाठी हँगिंग ऑर्गनायझर हा उत्तम पर्याय आहे. हे ऑर्गनायझर भिंतीला किंवा मजबूत हुकच्या मदतीने दरवाजाच्या मागील बाजूस लावता येतात. यामध्ये वेगवेगळे कप्पे असल्यामुळे टी-शर्ट, टॉप्स, लेगिंग्स आणि लहान कपडे सहज ठेवता येतात. यामुळे जमिनीवरील जागाही वाचते आणि कपडे शोधणेही सोपे होते.
कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी प्लास्टिक किंवा कापडी बास्केटचा वापर करता येतो. या बास्केटमध्ये तुम्ही कपड्यांचे प्रकारानुसार वर्गीकरण करू शकता. उदाहरणार्थ, एका बास्केटमध्ये रोजचे कपडे, दुसऱ्यामध्ये घरात घालण्याचे कपडे आणि तिसऱ्यामध्ये लहान कपडे ठेवता येतील. या बास्केट बेडच्या बाजूला, टेबलखाली किंवा खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवता येतात. त्यामुळे कपड्यांचा पसारा कमी होण्यास मदत होते.
घरात कायमस्वरूपी कपाट ठेवणे शक्य नसेल तर फोल्डेबल स्टोरेज रॅक हा चांगला पर्याय आहे. हे रॅक हलके असतात आणि गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतात. यामध्ये अनेक कप्पे असल्यामुळे कपडे वेगवेगळे ठेवता येतात. काही रॅक वापरात नसताना फोल्ड करून ठेवण्याची सुविधाही असते. त्यामुळे लहान घरांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
घरातील दरवाजाच्या मागील बाजूची जागा अनेकदा रिकामी असते. या जागेचा वापर कपडे ठेवण्यासाठी करता येतो. दरवाजावर लावता येणारे हुक किंवा मल्टिपल हँगर वापरून तुम्ही रोज वापरणारे कपडे, स्कार्फ, स्टोल आणि जॅकेट्स टांगू शकता. यामुळे कपडे इकडे-तिकडे पडणार नाहीत आणि खोलीही व्यवस्थित दिसेल. मात्र, हुक लावताना दरवाजा सहज उघडता-बंद करता येईल याची काळजी घ्या.
जाड कपडे, ब्लँकेट्स आणि स्वेटर्स ठेवण्यासाठी व्हॅक्यूम स्टोरेज बॅगचा वापर करता येतो. या बॅगमध्ये कपडे भरल्यानंतर व्हॅक्यूमच्या मदतीने त्यातील हवा बाहेर काढली जाते. त्यामुळे कपड्यांचा आकार कमी होतो आणि कमी जागेत जास्त सामान ठेवता येते. विशेषतः हिवाळ्यात वापरले जाणारे कपडे उन्हाळ्यात साठवण्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरतो. कपडे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे करूनच बॅगमध्ये ठेवावेत.
कपडे ठेवण्यापूर्वी त्यांचे रोजचे, सणासुदीचे आणि हंगामानुसार वर्गीकरण करा.
न वापरणारे कपडे वेगळे काढून ठेवा.
कपडे ठेवण्यासाठी हवेशीर आणि कोरडी जागा निवडा.
प्रत्येक बॉक्स किंवा बास्केटला लेबल लावा, म्हणजे कपडे शोधणे सोपे होईल.
कपड्यांमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.