

चपाती, पराठे, सँडविच किंवा उरलेलं जेवण पॅक करण्यासाठी अनेक घरांमध्ये अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. गरमागरम जेवणही थेट फॉइलमध्ये गुंडाळून ठेवण्याची सवय अनेकांना असते. पण गरम अन्न फॉइलमध्ये ठेवल्याने त्यातील अॅल्युमिनियम अन्नात मिसळू शकतं का? याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का? असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. याबाबत एका संशोधनातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
'नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात अॅल्युमिनियमची भांडी आणि फॉइलचा वापर याबाबत माहिती देण्यात आलीये. हे संशोधन AIIMS दिल्लीच्या औषधशास्त्र विभागाशी संबंधित डॉ. योगेंद्र कुमार गुप्ता यांनी लिहिलंय. या संशोधनात अॅल्युमिनियमचा अन्नात किती प्रमाणात मिसळू शकतो आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
संशोधनानुसार, अॅल्युमिनियमच्या भांड्यात किंवा फॉइलमध्ये अन्न ठेवल्यास त्यातील काही अॅल्युमिनियम अन्नात मिसळू शकतं. या प्रक्रियेला 'लीचिंग' असं म्हणतात. पण अन्नात किती अॅल्युमिनियम मिसळेल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.
अन्न किती गरम आहे ते किती वेळ फॉइलमध्ये ठेवलं आहे, अन्नाचा प्रकार कोणता आहे आणि त्यात कोणते पदार्थ आहेत, यावर अॅल्युमिनियम मिसळण्याचं प्रमाण ठरतं. त्यामुळे फॉइलमध्ये ठेवलेलं प्रत्येक गरम अन्न आरोग्यासाठी घातक असतं, असं म्हणणं योग्य नाही. पण काही परिस्थितीत अन्नात अॅल्युमिनियम मिसळण्याचं प्रमाण वाढू शकतं.
अन्नातील आंबटपणा, मीठ आणि काही नैसर्गिक आम्लांमुळे अॅल्युमिनियम अन्नात मिसळण्याचं प्रमाण वाढू शकतं, असं संशोधनात सांगण्यात आलंय. त्यामुळे खालील पदार्थ फॉइलमध्ये ठेवताना काळजी घेणं गरजेचं आहे.
टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनवलेले पदार्थ
लिंबू आणि आंबट पदार्थ
व्हिनेगर आणि आंबट चटण्या
जास्त मीठ असलेले पदार्थ
आंबट आणि खारट पदार्थांचं मिश्रण
फॉइलमध्ये अन्न ठेवल्यानंतर त्याचा किती वेळ संपर्क राहतो आणि अन्न किती गरम आहे, याचाही परिणाम होतो. जास्त तापमान आणि जास्त वेळ अन्न फॉइलच्या संपर्कात राहिल्यास अन्नात अॅल्युमिनियम मिसळण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे गरम अन्न बराच वेळ फॉइलमध्ये गुंडाळून ठेवणं टाळणं योग्य ठरू शकतं. गरम आणि आंबट पदार्थ फॉइलमध्ये जास्त वेळ ठेवल्यास अधिक काळजी घ्यायला हवी.
संशोधनानुसार, निरोगी व्यक्तीच्या पचनसंस्थेतून अन्नातील अॅल्युमिनियम फार कमी प्रमाणात शरीरात शोषलं जातं. त्यानंतर ते किडनीच्या मदतीने शरीरातून बाहेर टाकलं जातं. पण ज्या लोकांच्या किडनीचं कार्य व्यवस्थित होत नाही, त्यांच्या शरीरात अॅल्युमिनियम जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी अॅल्युमिनियमचा वापर कमी करणं योग्य आहे.
अॅल्युमिनियम फॉइलचा वापर पूर्णपणे बंद करावा, असं या संशोधनात सांगण्यात आलेलं नाही. डॉक्टरांच्या मते, सामान्य लोकांमध्ये फॉइलच्या वापरामुळे अॅल्युमिनियम विषबाधा होण्याचा धोका नसतो. अन्न कोणतं आहे आणि फॉइलचा वापर कसा केला जातो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.