

तुमचं हार्ट हेल्दी आहे की नाही हे समजण्यासाठी आपण रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर अशा गोष्टी तपासतो. पण तुमच्या मांडीचा घेरही तुमच्या हार्टच्या आरोग्याबद्दल काही महत्त्वाचे संकेत देऊ शकतो. मांडीतील स्नायूंचं प्रमाण आणि त्यांचा शरीराच्या कामकाजावर होणारा परिणाम यावरून हार्ट अटॅकचा धोका आणि अकाली मृत्यूची शक्यता समजू शकते असं एका अभ्यासातून समोर आलंय.
रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्ष व्यास यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत माहिती दिलीये. मांडीचा घेर आणि मांडीतील स्नायूंचं प्रमाण यांचा हृदयाच्या आरोग्याशी संबंध असल्याचे त्यांनी सांगितलंय. डेन्मार्कमध्ये झालेल्या एका अभ्यासाचाही त्यांनी यासाठी उल्लेख केला.
मांडीचा घेर आणि हृदयाचं आरोग्य यांचा नेमका काय संबंध आहे? मांडीचं मोजमाप केल्याने हार्ट अटॅकचा धोका ओळखता येतो का? याबाबत एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आणि असोसिएट डायरेक्टर डॉ. एल. के. झा यांनी माहिती दिली आहे.
मांडीचा घेर हा शरीरातील स्नायूंचं प्रमाण आणि शरीराची चयापचय प्रक्रिया म्हणजेच अन्नातून ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया किती योग्य आहे याचे संकेत देतो. संशोधनानुसार, मांडीचा घेर कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असू शकतो.
डॉ. झा यांच्या माहितीनुसार, २००९ मध्ये BMJ या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात २,८१६ महिला आणि पुरुषांचा समावेश होता. या अभ्यासात मांडीचा घेर कमी असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक, हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचं आढळलं. मांडीचा घेर साधारण ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असताना हा संबंध अधिक स्पष्ट दिसून आला.
मांडीमध्ये शरीरातील मोठे स्नायू असतात. यामध्ये क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग्स या स्नायूंचा समावेश असतो. या स्नायूंचं काम रक्तातील साखर वापरणं, शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे काम करणं आणि अन्नातून मिळालेली ऊर्जा वापरणं असतं. स्नायूंचं प्रमाण कमी असल्यास शरीराला ब्लड शुगर योग्य प्रकारे वापरण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे इन्सुलिनचा परिणाम कमी होणं, शरीरातील चयापचय प्रक्रेत बिघाड होणं आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
पण मांडीचा घेर म्हणजे हृदयाच्या आरोग्याची थेट तपासणी नाही. मांडीच्या घेरामध्ये स्नायूंसोबत त्वचेखालील चरबीचाही समावेश असतो. त्यामुळे मांडीचा घेर पाहूनच आरोग्याबाबत निष्कर्ष काढणं योग्य नाही.
मांडीतील स्नायू शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास आणि इन्सुलिन योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतात. स्नायू कमी असतील आणि शारीरिक हालचाल कमी असेल, तर शरीरात इन्सुलिनचा परिणाम कमी होऊन रक्तातील साखरेचं नियंत्रण बिघडू शकतं. याचा परिणाम अधिक काळ राहिल्यास टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
स्नायू शरीरासाठी आणखी एक महत्त्वाचं काम करतात. आपण व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करत असताना स्नायूंमधून मायोकाइन्स नावाचं काही घटक बाहेर पडतात. हे घटक शरीरातील सूज कमी करण्यास, रक्तातील साखरेचा वापर सुधारण्यास आणि चरबीचा वापर करण्यास मदत करतात. चालणं, सायकल चालवणं, पोहणं आणि वजनाच्या मदतीने व्यायाम करणं अशा गोष्टींमुळे शरीरातील मोठ्या स्नायूंना काम मिळतं. यामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
२००९ मध्ये झालेल्या अभ्यासात मांडीचा घेर साधारण ६० सेंटीमीटरपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं होतं. पण हा आकडा प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणारा ठराविक नियम नाही, असं डॉ. झा यांनी स्पष्ट केलंय.
मांडीचा घेर किती आहे, यावर व्यक्तीची उंची, वय, स्त्री किंवा पुरुष असणं, वंश आणि शरीरातील स्नायू व चरबीचं प्रमाण अशा अनेक गोष्टींचा परिणाम होतो. मांडीचा घेर मोजल्याने त्यामध्ये स्नायू किती आहेत आणि चरबी किती आहे, हे वेगळं समजत नाही. मांडीचा घेर ६० सेंटीमीटरपेक्षा कमी आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक होणारच, असं म्हणता येणार नाही.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.