शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सतत वाढत असेल तर त्यामागे केवळ एखादा आजारच कारणीभूत असेल असं नाही. आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीचाही त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त प्रमाणात गोड खाणं तसंच शारीरिक हालचाल कमी असणं यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढण्याचा धोका असतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात कोणते छोटे बदल करता येतील, याबाबत डॉक्टर बिमल छाजेर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. डॉ. छाजेर यांनी सांगितलंय की, “शरीरात तयार होणाऱ्या एकूण कोलेस्ट्रॉलपैकी सुमारे ७० टक्के कोलेस्ट्रॉल शरीर स्वतः तयार करतं. उरलेल्या ३० टक्के कोलेस्ट्रॉलवर आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचा परिणाम होतो.”
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात सोल्युबल फायबर म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या तंतूंचं प्रमाण वाढवणं फायदेशीर ठरू शकतं. ओट्स, जव, डाळी, बीन्स, सफरचंद, गाजर आणि पालक यांसारख्या पदार्थांमधून हे फायबर मिळतं. हे फायबर पचनसंस्थेत कोलेस्ट्रॉलला शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तात जाणाऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
दररोज तळलेले पदार्थ खाण्याची सवय किंवा मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन शक्य तितकं कमी करणं योग्य ठरतं.
यासोबतच मांसाहारी पदार्थ आणि फुल-फॅट म्हणजेच जास्त चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवनही मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी कमी चरबीचं किंवा फॅट-फ्री दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निवडता येऊ शकतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आठवड्यात किमान १५० मिनिटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्याचं लक्ष्य ठेवता येतं. यासाठी जिममध्ये जाणंच आवश्यक आहे असं नाही. वेगाने चालणं, योगासनं किंवा सायकल चालवणं यांसारख्या साध्या व्यायामांचाही फायदा होऊ शकतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
जर वजन जास्त असेल तर थोडं वजन कमी करणं देखील फायदेशीर ठरू शकतं. यामुळे शरीरात खराब म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून केवळ तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळणं पुरेसं नाही. मात्र अतिप्रमाणात गोड खाण्यानेही तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. जास्त प्रमाणात गोड पेय, मिठाई आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानेही वजन वाढू शकतं. त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखरयुक्त पेयं, मिठाई आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचं सेवन कमी करणं महत्त्वाचं आहे.
काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे त्यांच्या जनुकांचाही म्हणजेच आनुवंशिक कारणांचा संबंध असू शकतो. Familial Hypercholesterolemia या आजारात कोलेस्ट्रॉलची पातळी आनुवंशिक कारणांमुळे जास्त असू शकते. अशा परिस्थितीत केवळ आहार आणि व्यायामावर अवलंबून राहणं पुरेसं ठरणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी आणि उपचार घेणं आवश्यक असतं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं, नियमित व्यायाम करणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणं महत्त्वाचं आहे. रोजच्या सवयींमध्ये केलेले छोटे बदल दीर्घकाळात हृदयाच्या आरोग्यासाठी मोठे फायदे देऊ शकतात.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.