Shruti Vilas Kadam
सर्वप्रथम अर्धा किलो ताजा पालक घ्या. त्याची पाने वेगळी करून स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन घ्या. यामुळे पालकावरील माती आणि धूळ निघून जाईल.
एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात पालकाची पाने टाकून २ ते ३ मिनिटे उकळवा. त्यानंतर पालक थंड पाण्यात काढा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करा.
२०० ग्रॅम पनीर घ्या आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. आवडीनुसार पनीर हलके तळून घेऊ शकता किंवा थेट भाजीमध्ये वापरू शकता.
कढईत २ चमचे तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट घालून शिजवा.
आता त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर तयार केलेली पालकाची पेस्ट घालून ५ ते ७ मिनिटे शिजवा.
आता पालकाच्या मिश्रणात पनीरचे तुकडे घाला. त्यात थोडे पाणी आणि २ चमचे फ्रेश क्रीम घाला. सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा आणि ३ ते ४ मिनिटे शिजू द्या.
शेवटी भाजीवर थोडे गरम मसाला आणि फ्रेश क्रीम घाला. कोथिंबिरीने सजवा. तयार आहे चविष्ट हॉटेलस्टाइल पालक पनीर! ही भाजी तुम्ही गरम पोळी, पराठा, नान किंवा जीराभातासोबत सर्व्ह करू शकता.