Eetha controversy: दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी 'ईठा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सुरुवातीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आता चित्रपटाच्या नावासह काही प्रसंगांवर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, निर्मात्यांकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
'आवाज लोकशाहीचा' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विठाबाई यांचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी सांगितले की, चित्रपटाबाबत त्यांना अवघ्या आठवडाभरापूर्वी माहिती मिळाली. टीझरमध्ये त्यांचा जन्म स्टेजच्या मागे झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आईचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवला जात असल्याचा आनंद असला तरी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी कुटुंबाशी चर्चा झाली असती, तर अनेक ऐतिहासिक आणि वैयक्तिक बाबी अधिक अचूकपणे मांडता आल्या असत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी चित्रपटाचे नावही बदलण्याची मागणी केली. ग्रामीण भागात 'विठा'ला 'ईठा' असे उच्चारले जात असले तरी विठाबाईंचे खरे नाव पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी चित्रपटाचे नाव 'विठा' किंवा 'विठाबाई नारायणगावकर' असे ठेवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, जेणेकरून आक्षेपार्ह बाबी असल्यास त्या दूर करता येतील, अशी मागणीही त्यांनी केली.
विठाबाई यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनीही चित्रपटाच्या शीर्षकावर आणि काही ऐतिहासिक संदर्भांवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, महाराष्ट्रातील लोककलावंतांची ओळख त्यांच्या गावाच्या नावासहच पूर्ण होते. त्यामुळे 'नारायणगावकर' हे आडनाव चित्रपटाच्या शीर्षकात किंवा सबटायटलमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अनेक चुकीच्या माहितीचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, निर्माते आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 2 किंवा 3 जुलैपर्यंत निर्मात्यांकडून संपर्क झाला नाही, तर उच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल', असा इशाराही त्यांनी दिला. चित्रपटात योग्य पद्धतीने विठाबाईंचे जीवन मांडत असेल तर त्याचे स्वागत करू, मात्र चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती असल्यास न्यायालयाचा मार्ग स्वीकारू, अशी स्पष्ट भूमिका कुटुंबीयांनी मांडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.