

बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. भटक्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. हर्षल शिंदे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल शिंदे हा आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेकडील शनिनगर परिसरात गेला होता. एका मित्राला घरी सोडण्यासाठी ते तिथे आले होते. याचवेळी परिसरातील एक महिला भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होती. दरम्यान तिथे असलेला एक भटका कुत्रा हर्षल आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला.
कुत्रा मागे लागल्याने हर्षलने घाबरून जोरात पळायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका दुकानात थांबला होता. पण वेगाने पळत असतानाच त्याला हार्ट अटॅक आला. यातच त्याचा मृत्यू झाला. बदलापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली.
विशेष म्हणजे हर्षलची तीन वर्षांपूर्वीच हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून तो खूप वेगाने पळाल्याने त्याच्या हृदयावर ताण आला आणि त्याला हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जातोय. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.