Rohit Shetty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना शनिवारी सकाळी पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने रोहित शेट्टी यांच्याकडे तब्बल 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या धमकीमागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामागे बिश्नोई गँगचा संबंध आहे का, याचाही तपास पोलीस आणि गुन्हे शाखेकडून केला जात आहे. धमकीचा फोन कुठून आला, त्यासाठी कोणते माध्यम वापरण्यात आले आणि त्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.
यापूर्वीही रोहित शेट्टीच्या मुंबईच्या घरावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आतापर्यंत 15 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा अशा विविध राज्यांतून ताब्यात घेण्यात आले होते.
गोळीबारासाठी नेपाळमधून निधी आल्याचा तपासात खुलासा
31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री जुहू येथील रोहित शेट्टीच्या नऊ मजली इमारतीवर पाच राऊंड गोळीबार करण्यात आला होता. त्यापैकी एक गोळी इमारतीतील जिमच्या काचेवर लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. तपासादरम्यान हल्ला करणाऱ्या शूटरना देण्यात आलेला निधी नेपाळमधून पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा पैसा आरोपींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता आणि त्यानंतर एटीएमद्वारे रोख स्वरूपात काढण्यात आला होता.
दरम्यान, आता पुन्हा आलेल्या धमकीच्या फोनमुळे रोहित शेट्टीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, आरोपींचा लवकरच माग काढला जाईल, असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.