बॉलिवूडमध्ये आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या स्वरा भास्करचा आज ३६ वा वाढदिवस आहे. स्वराने गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. गेल्याच वर्षी तिने एका गोंडस मुलीलाही जन्म दिला. सध्या अभिनेत्री आपलं खासगी आयुष्य छान जगत आहे. नेहीमच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या स्वराच्या खासगी आयुष्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा ९ एप्रिल १९८८ रोजी दिल्लीत जन्म झाला होता. स्वराचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते, तर तिची आई दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात प्राध्यापक होती. कोणतीही भीती न बाळगता सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर स्वरा कायमच आपले रोखठोक मत मांडण्याचा ती प्रयत्न करते. स्वराने आपल्या १५ वर्षांच्या सिनेकारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्यात. स्वरा भास्करने तिच्या सिनेकरियरमध्ये आतापर्यंत जेमतेम १४ चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्यापैकी तिचे ९ चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत.
स्वराने लग्नाच्या वाढदिवशी त्यांची लव्हस्टोरी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितली होती. पोस्टमध्ये स्वरा म्हणते, “फहाद आणि मी जरीही घाईघाईमध्ये लग्न केलं असलं, तरी आम्ही लग्नाच्या तीन वर्ष आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. आधी आमची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आमच्यामध्ये कसं प्रेम झालं, हे आम्हाला दोघांनाही कळलं नाही. कारण आमच्यात कदाचित हिंदू- मुस्लिमहा मोठा फरक होता. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे. आम्ही दोघंही दोन वेगवेगळ्या शहरांतून आलेलो आहेत. मी एका मोठ्या शहरातली मुलगी आहे. माझ्या कुटुंबामध्ये इंग्रजी भाषेमध्ये बोलायचे आणि फहाद उत्तर प्रदेशातल्या एका लहानशा शहरातला मुलगा आहे. त्याच्या कुटुंबामध्ये उर्दू आणि हिंदुस्थानी भाषा बोलली जाते.”
लव्हस्टोरीबद्दल सांगताना, स्वरा पुढे म्हणाली, “मी हिंदी सिनेसृष्टीतली एक अभिनेत्री आहे, तर फहाद एक रिसर्च स्कॉलर, राजकीय कार्यकर्ता आणि राजकारणी आहे. पण आमच्या उदारमतवादी, कला, शिक्षण, राजकीय विचारधारा आणि समाज व देशासाठी एक समान विचारधारेबद्दल बोलताना एक भाषा मिळाली. आम्ही दोघंही डिसेंबर २०१९ मध्ये CAA-NRC निषेधाच्या वेळी भेटलो होतो. आम्ही एकत्र आंदोलनही केले होते. तेव्हापासून आमची मैत्री झाली. त्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. मग हळूहळू आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हाला दोघांनाही एकमेकांप्रती भरोसा आहे. कुठलीही गोष्ट असो, आम्ही एकमेकांसोबत ती शेअर करत असतो.”
स्वरा पुढे म्हणाली, “मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत खूप बोलायचो. एक दिवस मी फहादला विचारले की, पुढे काय करायचंय. आपण एकमेकांपासून फार वेगळे असलो तरीही आपण एकत्रच असल्याचं फहाद मला म्हणाला. आधी आम्ही दोघांनीही व्यवस्थित सेटल होण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी काही वेळ दिला होता. त्याने माझ्याकडे पुढे लग्नाच्या दृष्टीने सेटल होण्यासाठी काही वेळ मागितला. आणि मग लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याचा हा निर्णय पाहून मला तो खूप आवडू लागला. पण खरे सांगायचं तर, त्याच्या प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासापुढे मी हरले. आमच्या दोघांचंही प्रेम पाहून आमच्या कुटुंबीयांना विश्वासच बसत बसला नव्हता.”
स्वरा पुढे म्हणाली, “शेवटी आमच्या प्रेमात ताकद होती, प्रेम आणि जिव्हाळा होता. त्यानंतर आम्ही दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबीयांना भेटवलं, त्यांना खूप छान वाटलं. आणि नंतर दोघांनीही आपल्या कुटुंबीयांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यांना दिलासा मिळाला. स्वरा भास्करने जानेवारी २०२३ मध्ये फहाद अहमदसोबत स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते. लग्नानंतर महिनाभरातच ती गरोदर राहिली.”
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.