महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे. आता पात्र लाभार्थ्यांच्या पालकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक कागजपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. पात्र मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आधारच्या माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती घेण्यात येणार आहेत, मुलगी, तिची आई आणि वडिलांचे ई-केवायसी केले जाणार आहे. योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे लाभाची रक्कम मिळवण्यासाठी वेगळ्या प्रक्रियेची गरज भासणार नाही.
लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलीला वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण १ लाख १ हजार रुपये मिळतात.
जन्मानंतर – ५००० रुपये
इयत्ता पहिलीत प्रवेश – ६००० रुपये
इयत्ता सहावीत प्रवेश – ७००० रुपये
इयत्ता अकरावीत प्रवेश – ८००० रुपये
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – ७५००० रुपये
म्हणजेच मुलीला विविध टप्प्यांवर मिळून एकूण १.०१ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.
१ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरलेल्या मुलींना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पण नव्याने जन्मलेल्या मुलीच्या बाबतीत जन्मानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढच्या टप्प्यांवरच्या लाभासाठी पुन्हा स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि सरकारने निश्चित केलेल्या उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 2,98,695 लाभार्थींना योजनेची पहिली हप्ता मिळाली आहे. अर्ज प्रक्रिया सोपी केल्यामुळे जास्त पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.