देशातील अन्नसुरक्षा निश्चित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) वेळोवेळी विविध नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी करत असतं. आता FSSAI ने सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि फूड प्रोडक्शन कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
या नव्या निर्देशानुसार, अन्न तयार करताना, कापताना, प्रक्रिया करताना किंवा पॅकिंग करताना वापरले जाणारे चाकू, ब्लेड आणि इतर कटिंग टूल्स पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी अजूनही गंजलेले, तुटलेले किंवा रंग निघालेले चाकू वापरले जात असल्याचं निदर्शनास आलं. अशा उपकरणांचा वापर ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
FSSAI ने स्पष्ट इशारा दिला आहे की, या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
FSSAI ने जारी केलेल्या आदेशात नमूद केलंय की, काही फूड बिझनेसमध्ये अजूनही निकृष्ट दर्जाचे चाकू आणि कटिंग टूल्स वापरले जातायत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन्स 2011 मधील शेड्यूल 4 नुसार, अन्नाच्या थेट संपर्कात येणारी सर्व भांडी, उपकरणं आणि साधनं फूड-ग्रेड टॉक्सिक घटक नसलेल्या साहित्यापासून तयार केलेली असणं बंधनकारक आहे.
FSSAI ने सर्व राज्यांतील फूड सेफ्टी कमिशनर आणि तपासणी अधिकाऱ्यांना या नियमांच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेत. रेस्टॉरंट, कॅफे, हॉटेल किंवा अन्न उत्पादन करणारी कोणतीही कंपनी जर असुरक्षित किंवा खराब चाकू वापरताना आढळली तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
किचनमधील चाकूंना गंज लागणं ही केवळ दिसण्यापुरती समस्या नसून त्याचा थेट परिणाम अन्नाच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो. प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, गंजलेले आणि अस्वच्छ चाकू वापरल्यास अन्नामध्ये बॅक्टेरिया तयार होऊन अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो.
धातूवर गंज तयार झाल्यानंतर त्याचा पृष्ठभाग खडबडीत होतो. अशा ठिकाणी साल्मोनेला आणि ई-कोलाईसारखे धोकादायक जीवाणू सहज वाढू शकतात. या जीवाणूंना पूर्णपणे नष्ट करणं सामान्य धुण्याने शक्य होत नाही, कारण ते सूक्ष्म छिद्रांमध्ये लपून राहतात. नंतर हेच जीवाणू अन्नामध्ये मिसळून फूड पॉइझनिंगसारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.