सकाळी चहाचा घोट आणि सोबत मऊ क्रिम पाव... नुसता माहोल ना! आहा...हा...काय भन्नाट चव ना.. क्रीम पाव नुसतं नाव जरी काढलं तरी लगेच तोंडाला पाणी सुटतं राव... खारी, बटर किंवा पाव, चहासोबत मस्त ताव मारायचा हा अनेकांचा शिरस्ताच झालाय. सकाळच अशी चविष्ट, रुचकर होते. पण थांबा...तुम्हाला जर चहासोबत क्रीम पाव खायची सवय असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आधी बघा.. हा व्हिडिओ आणि त्यातली ती किळस येतील अशी दृश्ये बघितल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटण्याऐवजी तुमच्या तोंडचं पाणी कुठल्याकुठे पळून जाईल! आयुष्यात चहासोबत क्रीम पाव खाण्याची कधीच इच्छा होणार नाही.
घाणेरडी खोली, घाणेरड्या कार्पेटवर ठेवलेले इतर पावांचे तुकडे, लादीवर पडलेला पावाचा ढिग आणि त्यातच पावांमध्ये क्रीम भरण्याचं काम सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारं हे दृश्य पाहून किळस आल्याशिवाय राहणार नाही. पावातली जी क्रीम आपण चवीनं खातो, ती कशी तयार होते हे या व्हायरल व्हिडिओत बघायला मिळालंय.
एका अस्वच्छ खोलीत पावांचा ढिग पडला आहे. दोन व्यक्ती एका प्लॅस्टिकवर बसले आहेत. त्यांच्या समोरची क्रीम त्या पावामध्ये भरत आहेत आणि घाणेरड्या भिंतीकडे फेकत आहेत, असं त्या व्हिडिओत दिसतंय.
आजूबाजूला किती अस्वच्छता आहे हे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. आजूबाजू्च्या भिंती, लादी आणि संपूर्ण जागेची अवस्था पाहिल्यानंतर आपण इतके दिवस चवीच्या नावाखाली असले क्रीम पाव खातोय, असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी FDA च्या धडक कारवाया सुरू आहेत. या कारवायांमुळं नागरिक या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं कौतुक करत आहेत. तर अशा अस्वच्छ किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात लोकांचा संताप अधिक वाढत आहे. हा व्हिडिओ बघून तर संताप आणखीच वाढला असून, अशा प्रकारे पदार्थ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, कधी शूट करण्यात आला आणि व्हिडिओतील ठिकाणाची अधिकृत माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.