सध्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग. तास-दोन तासांचं काम चुटकीसरशी होतं म्हणे! अख्ख्या जगाला या एआयनं भुरळ घातलीये. CHATGPT, GEMINI, CLAUDE यांसारखे एआय टुल्स विद्यार्थी, तज्ज्ञमंडळी ते राजकारण्यांपर्यंत सगळेच वापरू लागलेत. शॉर्टकट्स, डोक्याला जास्त ताप न देता काम करणारी GEN Z हल्ली या AI टूल्सचा वापर करून भन्नाट प्रयोग करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि GEN Z ची आयडीया यांनी एकत्र कोणतेही काम केले ना तर भला मोठा आव्हानांचा डोंगरही एका झटक्यात पार करू शकतात. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका मुलानं चॅटजीपीटीची घेतलेली मदत आणि त्याचा मिळालेला रिझल्ट हे चक्रावणारं आहे. कारण विषयच हार्ड होता.
उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. सहाजिकच मंदिराबाहेरच्या परिसरात चपलांचा ढिगारा बघायला मिळतो. मग अनेकांच्या चपला गायब होतात. काही चोरीला जातात. कधी कधी एवढा मोठा पसारा बघून आपली चप्पल नेमकी कोणती हेच माणूस विसरतो. आपली चप्पल चोरीला गेली, असा समज करून तो तिथून निराश चेहरा करून निघून जातो. कुणी चोरट्यांच्या नावानं बोटं मोडून दुसरी चप्पल खरेदी करतो. पण गोव्याच्या शुभांगचा विषयच हार्ड होता. तो सुद्धा उज्जैनला श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आला होता. श्री महाकालचे दर्शन घेऊन शुभांग बाहेर आला. बघतो तर काय, त्याची चप्पल गायब होती. तो इकडे तिकडे, चपलांच्या ढिगाऱ्यात चप्पल शोधू लागला. चप्पल हरवली असं त्यानंही मान्य करून निघालाच होता, पण तितक्यात त्याची ट्यूब पेटली. मग टेक्नॉलॉजीचा वापर करून सुरू झाला चपलेचा शोध. टेक्नॉलॉजी काय, तर तुमच्या आमच्या मोबाइलवर सहज उपलब्ध असलेले एआय टूल म्हणजे चॅटजीपीटी!
त्याच्या मोबाइलच्या गॅलरीत कधीतरी चपलांचा फोटो काढलेला होता. तो त्यानं लागलीच चॅटजीपीटीवर अपलोड केला. त्यावर प्रॉम्प्ट दिला. शुभांगनं साईज, कलर, स्टाईल यांसारखी बारीकसारीक माहिती दिली. पाठवलेला फोटो आणि माहितीची जुळवाजुळव करत CHATGPT ने चप्पल कोणत्या कोपऱ्यात पडली आहे, कोणत्या चपलांच्या बाजूला आहे याची अगदी
सविस्तर माहिती दिली. CHATGPT ने सांगितल्याप्रमाणे शुभांगने टिप्स फॉलो केल्या आणि अखेर भल्यामोठ्या ढिगाऱ्यातून शुभांगला त्याची चप्पल सापडली.
हा व्हिडिओ शुभांगने सोशल मीडियावर अपलोड केला. CHATGPT ला दिलेले प्रॉम्प्ट्स, CHATGPT च्या टिप्स यांचा स्क्रीनरेकॉर्ड करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून या अजब इन्व्हेस्टिगेशन आणि रिझल्टनं नेटकरी चक्रावले आहेत. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांना CHATGPT हे देखील काम करू शकते यावर विश्वासच बसत नाहीये.