Vaibhav suryawanshi Century : १२ षटकार, ५ चौकार, १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं अवघ्या ३६ चेंडूंत ठोकलं शतक, आयपीलमधील सर्वात वेगवान सेंच्युरी

Vaibhav Suryawanshi Sixes RR vs SRH IPL Match : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्यानं सुरुवातीपासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. षटकारांचा पाऊस पाडला. डावाच्या पहिल्या सहा चेंडूंत पाच उत्तुंग षटकार ठोकले.
वैभव सूर्यवंशीची तुफानी फलंदाजी
Vaibhav Suryawanshi fifty saam tv
Published On

आयपीएलचा ३६ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात राजस्थानच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून सलामीला वैभव सूर्यवंशी मैदानावर आला. त्यानं इनिंगची सुरुवातच स्फोटक केली. आपल्या डावाच्या सुरुवातीच्या सहा चेंडूंत त्यानं पाच उत्तुंग षटकार लगावले. त्यानं कर्णधार पॅट कमिन्सलाही सोडलं नाही. त्यानं फेकलेल्या चेंडूवरही षटकार खेचला. वैभवनं विस्फोटक खेळी करत अवघ्या ३६ चेंडूंत शतक ठोकलं.

प्रफुल्ल हिंगेला लागोपाठ चार षटकार, कमिन्सचा पहिलाच चेंडू मैदानाबाहेर

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे सलामीला मैदानावर आले. सनरायझर्स हैदराबादकडून पहिली ओव्हर प्रफुल्ल हिंगे याने फेकली. त्याच्या पहिल्याच चेंडूवर जयस्वाल यानं एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राइकला वैभव आला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. पण पुढचे चार चेंडू थेट सीमापार धाडले. त्यातील दोन षटकार तर डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू फक्त चेंडू बघत राहिले.

हैदराबादकडून दुसरी ओव्हर टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला. कमिन्सच्या पहिल्या पाच चेंडूंचा सामना जयस्वाल यानं केला. त्यानंतर सहावा चेंडू खेळण्यासाठी वैभव स्ट्राइकला आला. वैभवने पॅट कमिन्सच्या या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला.

कमिन्सचाही घेतला क्लास

आयपीएल २०२६ च्या या पर्वात सगळ्यांच्या नजरा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे लागल्या आहेत. त्यानं आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी केली आहे. क्रिकेट विश्वातील महान फलंदाज आणि गोलंदाजाकडूनही वैभववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असलेल्या गोलंदाजांचीही त्यानं धुलाई केली आहे. जसप्रीत बुमराह, जोश हेजलवुड यांच्यासह आता पॅट कमिन्सच्याही गोलंदाजीचा त्यानं फडशा पाडला. आयपीएलमध्ये पॅट कमिन्सचा आजचा पहिलाच सामना होता. त्यात कमिन्सच्या पहिल्याच चेंडूचा सामना वैभव सूर्यवंशीनं केला. या पहिल्याच चेंडूवर वैभवने षटकार ठोकला.

१५ चेंडूतच अर्धशतक

वैभव सूर्यवंशीनं डावाची सुरुवातच आक्रमक केली. जयस्वाल जरी लवकर बाद झाला असला तरी, वैभववर कुठलाही दबाव दिसून येत नव्हता. त्यानं त्याचा नैसर्गिक खेळ सुरुच ठेवला. मैदानात धावांचा पाऊस पाडला. षटकारांची आतषबाजी सुरूच होती. अवघ्या १५ चेंडूंत त्यानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यात चार चौकार आणि तब्बल १० षटकारांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट २६३ पेक्षा अधिक होता. यानंतर तो थांबलाच नाही. यंदाच्या आय़पीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं.

१५ षटकार, ५ चौकारांसह १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने फक्त ३६ चेंडूत वादळी शतक ठोकले. पॅट कमिन्सपासून ते इशान मलिंगापर्यंत सर्व गोलंदाजांचा वैभवने समाचार घेतला. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान शतक ठोकले. २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने फक्त ३५ चेंडूत शतकी खेळी केली होती. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ३० चेंडूत शतक झळकावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com