

Yuzvendra Chahal announces retirement from first class cricket : वनडे असो की टी २० सामना...पहिल्या स्पेलमध्ये भारतीय गोलंदाज अपयशी ठरले तर, दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्या फिरकीच्या जादूने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडवून दांड्या गुल करणारा आणि भारतीय संघाला हमखास पहिलं यश मिळवून देण्यात माहीर असलेल्या युजवेंद्र चहल यानं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं आज, शुक्रवारी (२ ऑक्टोबर २०२६) फर्स्ट क्लास क्रिकेटमधून (प्रथम श्रेणी) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून त्यानं ही माहिती दिली.
चहलनं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं त्यानं स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून तो केवळ वनडे आणि टी २० क्रिकेट खेळला आहे. चहल गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काउंटी क्रिकेट खेळत होता. तो लॉर्ड्समध्ये नॉर्थम्प्टनशायर संघाकडून अखेरचा सामना खेळला आहे.
युजवेंद्र चहल यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडिया पोस्टमधून क्रिकेटची सुरुवात तर आतापर्यंतचा प्रवास यावर प्रकाशझोत टाकला आहे.
मी पहिल्यांदा लाल चेंडू हातात घेऊन क्रिकेटची सुरुवात केली होती. त्यावेळी मी १० वर्षांचा होतो. मला क्रिकेटचं इतकं वेड लागेल याचा अंदाजही त्यावेळी नव्हता. याच फॉरमॅटमध्ये संयम, अडचणींचा सामना करण्याची हिंमत मिळाली. त्यामुळेच तासनतास मैदानावर ठाण मांडून प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेटसाठी संघर्ष करण्याचा आनंद घेता आला. मी अखेरचा फर्स्ट क्लास सामना लॉर्ड्समध्ये खेळलो. हे सांगताना थोडं भावुक होत आहे. कसोटी कॅप मिळवणं माझं नेहमीच स्वप्न राहिलं. मी बरीच वर्षे ते स्वप्न उराशी बाळगून होतो. भले ते स्वप्न माझं अपूर्ण राहिलं. पण माझ्या या प्रवासात मी समाधानी आहे. या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी आभारी आहे, असं चहलने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
भारतीय संघातून बराच काळ बाहेर राहिलेल्या युजवेंद्र चहल यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी, आंतरराष्ट्रीय संघात जोरदार कमबॅक करण्याचा निर्धार त्यानं व्यक्त केला आहे. वनडे आणि टी २० संघात पुनरागमन करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देईल, असं त्यानं म्हटलंय. या प्रवासात सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यानं हरयाणा क्रिकेट संघ, रणबीर सिंह महिंद्रा सर आणि श्री अनिरुद्ध सिंह चौधरी यांचेही आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.