Rohit Sharma: ‘मला जिंकण्याचा तो अनुभव पुन्हा हवाय’; 2027 वर्ल्ड कपबाबत रोहित शर्माने सांगितली मनातली इच्छा

Rohit Sharma 2027 World Cup: रोहित शर्माने 2027 वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतासाठी पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव घ्यायचा असल्याचं त्याने सांगितलं. फिटनेस, फलंदाजी आणि शुभमन गिलच्या कर्णधारपदाबाबतही रोहितने आपली भूमिका स्पष्ट केली.
Rohit Sharma
Rohit Sharmasaam tv
Published On: 

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नजरा आता 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपवर आहेत. या स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सिरीजदरम्यान रोहितने भारतासाठी आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा व्यक्त केलीये.

‘वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव पुन्हा हवाय’

2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, यावर रोहितने भाष्य केलं. “आगामी वनडे वर्ल्ड कप जिंकला तर मला नक्कीच आनंद होईल. सध्या मी याला ‘फुल सर्कल’ वगैरे म्हणणार नाही. भारतासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव खूप खास असतो,” असं रोहितने सांगितलं.

Rohit Sharma
रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने स्पष्टच सांगून टाकलं,गिलच्या कॅप्टनशीपवरही भाष्य

रोहितने जिओस्टारशी बोलताना त्याच्या वर्ल्ड कपच्या आठवणीही सांगितल्या. 2007 मध्ये तो केवळ 20 वर्षांचा होता. त्याच वर्षी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मात्र त्यानंतर जवळपास 11 वर्षे भारताला आयसीसीची मोठी ट्रॉफी जिंकता आली नाही.

त्यानंतर 2024 मध्ये भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्या विजयानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवलं, असं रोहितने सांगितलं.

“मला माहितीये की वर्ल्ड कप जिंकल्यावर कसं वाटतं. त्यामुळे मला तो अनुभव पुन्हा घ्यायचा आहे. आम्ही नुकताच जो आनंद अनुभवला, तो शब्दांत सांगता येत नाही. त्या भावनेची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. त्यामुळे भारतासाठी तो वर्ल्ड कप जिंकणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला तो आनंद पुन्हा एकदा अनुभवायचा आहे,” असं रोहितने म्हटलं.

2027 चा विचार आत्तापासून नको

2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत स्वतःला फिट ठेवणं आणि चांगली कामगिरी करणं, हे रोहितचं सध्याचं लक्ष्य आहे. “2027 पर्यंत मला फिट राहायचं आहे, जेणेकरून मी चांगला खेळ करू शकेन. फिट राहणं, मेहनत करणं आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. सध्या मला याच गोष्टींचा विचार करायचा आहे,” असं रोहितने सांगितलं. पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काय होईल, याचा विचार आत्तापासून करण्याची गरज नाही, असंही रोहितने स्पष्ट केलं.

“आत्ता पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काय होईल, याचा विचार करून काही फायदा नाही. त्यापेक्षा माझ्यासमोर सध्या जे आहे ते योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. वर्तमानात राहणं, समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करणं आणि त्यानंतर पुढे जाणं, हीच माझी पद्धत आहे,” असं तो म्हणाला.

Rohit Sharma
Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

‘माझ्या खेळात काही बदल करण्याची गरज नाही’

आपल्या खेळात सध्या कोणताही मोठा बदल करण्याची गरज नसल्याचंही रोहितने सांगितलं. “मला काहीही बदलण्याची गरज नाही. आतापर्यंत माझा प्रवास जसा झाला आहे, त्याच पद्धतीने मला पुढे जायचं आहे. फलंदाजीवर मेहनत करत राहायची, फिटनेसवर काम करत राहायचं आणि संघातील खेळाडूंना मदत करायची. जिथे माझ्या मदतीची किंवा सल्ल्याची गरज असेल, तिथे माझं मत द्यायचं. एवढंच मला करायचं आहे,” असं रोहितने सांगितलं.

‘शुभमनला क्रिकेटची चांगली समज’

शुभमन गिलच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना रोहितने त्याचं कौतुक केलं. “शुभमनकडे क्रिकेटची चांगली समज आहे. त्याने जवळपास एक वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळात त्याचं कर्णधार म्हणून मूल्यांकन करणं योग्य ठरणार नाही. पण मी त्याला पाहत आलोय आणि तो चांगली कामगिरी करतोय,” असं रोहितने सांगितलं.

“शुभमनला त्याला काय करायचं आहे, हे अगदी स्पष्टपणे माहिती आहे. कर्णधारासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कर्णधाराला स्वतःला काय करायचं आहे हे स्पष्ट असेल, तर त्याच्या आसपासचे खेळाडूही त्याच दिशेने काम करू शकतात. शुभमनबाबत मला हेच दिसतं. त्याला काय हवं आहे हे त्याला माहीत आहे आणि तो योग्य दिशेने पुढे जातोय,” असंही रोहित म्हणाला.

कर्णधाराला टीममधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीची गरज असते. त्यामुळे शुभमनला जेव्हा आणि ज्या प्रकारे मदतीची गरज असेल, तेव्हा आपण नक्कीच त्याला मदत करू, असंही रोहितने स्पष्ट केलं.

Rohit Sharma
World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

‘शुभमनपासून दूर राहणार नाही’

शुभमनला पाठिंबा देण्याबाबतही रोहितने आपली भूमिका स्पष्ट केली. “शुभमन कर्णधार आहे, याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यापासून दूर राहीन किंवा त्याच्याशी कमी बोलेन. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आम्ही एकत्र खेळतोय. हे असंच सुरू राहिलं पाहिजे. त्याला संघातील प्रत्येकजण त्याच्यासोबत आहे, याचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. सर्वजण एकत्र पुढे जात आहेत, हे त्याला जाणवलं पाहिजे,” असं रोहितने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com