

मैदानाच्या चहूबाजूला लगावलेले सहा उत्तुंग षटकार आठवतात का?...फलंदाजाच्या बॅटमधून वायूवेगानं निघालेला चेंडू चित्त्यासारखा झेपावून रोखणारा आठवतोय का...? फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवून चकवा देणारा पार्ट टाइम ते फुल टाइम स्पिनर आठवतो का...होय, ते नाव म्हणजे युवराज सिंग...प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंवर 'दरारा' असलेला सिक्सर किंग युवराज सिंग याच्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सहायक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची निवड केली आहे. याआधी दिल्लीने माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा' अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे.
२०११ चा वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाचा वाटा असलेला युवराज आयपीएल २०२७ साठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहायक आणि फलंदाजी प्रशिक्षण असेल. त्याचा हा प्रशिक्षक म्हणून पहिलाच अनुभव असेल. क्रिकेट विश्वातला दादा म्हणजेच सौरव गांगुली याच्यासोबत तो काम करणार आहे. गांगुली मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं एक्स हँडलवर व्हिडिओ पोस्ट करून सिंगच्या निवडीची घोषणा केली. एक चॅम्पियन, लीडर आणि टायगर...अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा हा दिग्गज दिल्लीचा वारसा घडवण्यासाठी तयार आहे. युवराज सिंग, स्वागत आहे! अशी कॅप्शन या व्हिडिओसोबत पोस्ट केली आहे.
२००७ चा टी २० वर्ल्डकप, २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा युवराज याआधी दिल्ली संघाकडून खेळला होता. २०१५ मध्ये त्याला विक्रमी १६ कोटी रुपये देऊन दिल्लीनं संघात घेतलं होतं. दिल्ली संघासोबत पुन्हा नवी इनिंग सुरू करत असल्यानं युवराजनं भावुक प्रतिक्रिया दिली. दिल्ली कॅपिटल्ससोबत नवा अध्याय सुरू करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या संघासोबत माझं जुनं नातं आहे. संघमालकाला चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळं ही माझ्यासाठी एक विशेष संधी आहे.
दादासोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. कोचिंग ही माझी आवड आहे आणि प्रतिभावान संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूपच रोमांचक असेल आणि संघाच्या यशात माझं योगदान देण्यास मी सज्ज आहे, असं युवराज म्हणाला. तर आम्ही युवराज सिंग यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. दिल्ली कॅपिटल्ससोबत या रोमांचक आणि नव्या अध्यायाच्या सुरुवातीबद्दल युवराजना मनापासून शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया सहसंघमालक किरण कुमार ग्रँधी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.