

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडिया सध्या १-० ने आघाडीवर आहे. लखनऊमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने १०२ रनसची खेळी केली होती. आता सिरीजमधील दुसरा सामना ९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत चांगली कामगिरी केली होती. मात्र वेगवान गोलंदाज मयंक यादवची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे तो भारताकडून सर्वाधिक रन्स देणारा गोलंदाज ठरला. आता रांचीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये किती बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
टीम इंडियाने पहिला सामना सहज जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यातही कोणतेही बदल होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होतील असं सध्या वाटत नाही. पहिल्या सहा क्रमांकांवरील खेळाडूंची जागा जवळपास निश्चित मानली जातेय.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ओपनिंगला उतरू शकतात. त्यानंतर ईशान किशन फलंदाजीला येऊ शकतो. चौथ्या क्रमांकावर कर्णधार श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे खेळण्याची शक्यता आहे.
नमन धीरने लखनऊमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या मयंक यादवला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. तरीही तो युवा खेळाडू असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये, यासाठी त्याला आणखी एक संधी देऊ शकते. दरम्यान वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती.
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मयंक यादव
पहिल्या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यातही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.