

रणजी ट्रॉफीच्या 2026-27 सिझनसाठी मुंबईची टीम सज्ज झालीये. यंदाच्या सिझनमध्ये मुंबईसमोर 43वं रणजी विजेतेपद मिळवण्याचं लक्ष्य आहे. कर्णधार सिद्धेश लाड आणि उपकर्णधार आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम रविवारी चंदीगडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
मुंबईचं कर्णधारपद मिळाल्यानंतर सिद्धेश लाडसमोर मोठी जबाबदारी आहे. मुंबईने आतापर्यंत 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलीये. त्यामुळे मुंबईची जर्सी घालून मैदानात उतरताना दबाव असतो. मात्र, या दबावाला घाबरून न जाता त्याचा सामना करण्याचा टीमचा प्रयत्न असेल, असं लाडने सांगितले.
“मुंबईचा मोठा इतिहास आहे. आतापर्यंत आपण 42 रणजी विजेतेपदं मिळवली आहेत. अनेक मोठे खेळाडू या टीममधू खेळलेत. त्यामुळे मुंबईकडून खेळताना दबाव असणारच. मात्र आम्हाला या दबावापासून दूर जायचं नाही. हा दबाव स्वीकारून चांगली कामगिरी करायची आहे,” असं लाडने सांगितलं.
यंदा आयुष म्हात्रेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 19 वर्षांच्या म्हात्रेने आतापर्यंत 13 प्रथम श्रेणी सामन्यांत 660 रन्स केलेत. दुखापतीमुळे काही काळ टीमबाहेर राहिल्यानंतर त्याचं टीममध्ये कमबॅक झालंय. आयुषने सांगितलं की, मुंबईसारख्या मोठ्या टीमचा उपकर्णधार होणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. टीममधील सर्व खेळाडूंचा मला चांगला पाठिंबा मिळतोय.”
मुंबईच्या टीममध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासारखे खेळाडू टीमच्या फलंदाजी मजबूत करणार आहे. त्यांच्यासोबत दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर आणि इतर युवा खेळाडूही टीममध्ये आहेत.
यशस्वी जयस्वालची उपस्थिती टीमसाठी महत्त्वाची असल्याचे लाडने स्पष्ट केलं. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं युवा खेळाडूंसाठीही शिकण्याची मोठी संधी असते. गोलंदाजीमध्ये तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, शम्स मुलानी, तनुष कोटियन यांच्यासह सिल्वेस्टर डिसूझा आणि ओंकार तर्माळे यांच्याकडून मुंबईला अपेक्षा आहेत.
अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन मुंबईसाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याची उणीव नक्कीच जाणवेल, असंही लाडने सांगितलं.
“मी स्वतः अजिंक्यकडून खूप काही शिकलो आहे. तो आता खेळत नसला तरी एका फोनवर आमच्यासाठी उपलब्ध असतो. गरज पडल्यास तो आम्हाला नक्की मदत करेल,” असं लाडने सांगितलं.
कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर टीममध्ये मोठे बदल करण्याचा विचार नसल्याचंही लाडने स्पष्ट केलंय. शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने अनेक गोष्टी शिकल्या आहेत. त्या अनुभवाचा उपयोग यंदाच्या सिझनमध्ये करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
मुंबईचा 16 खेळाडूंची टीम यंदाच्या रणजी सिझनसाठी तयार आहे. सिद्धेश लाड कर्णधार, तर आयुष म्हात्रे उपकर्णधार आहे. यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सरफराज खान, सुवेद पारकर, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा आणि ओंकार तर्माळे यांचा टीममध्ये समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.