RCB vs GT Final : पावसामुळं फायनल रद्द झाली तर कोण ठरणार IPL विजेता, जाणून घ्या नियम

who wins if ipl 2026 final is washed out : अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळं हा सामना रद्द झाला किंवा निकाल लागू शकला नाही तर आयपीएल विजेता संघ कोणता ठरणार, याबाबत जाणून घेऊयात नियम...
आयपीएल फायनलवर पावसाचे सावट, नियमानुसार कोण ठरणार विजेता संघ?
IPL final 2026 GT vs RCB saam tv
Published On

IPL 2026 ची अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन धुरंधर संघांमध्ये होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. त्याआधी हवामान विभागाच्या अलर्टनं आयपीएल चाहत्यांची चिंता वाढवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दिवशी अहमदाबादसह गुजरातच्या अनेक भागांत ढगांच्या गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळं पावसामुळं हा अंतिम सामना रद्द झाला किंवा काही कारणास्तव निकाल लागू शकला नाही तर दोन्ही संघांपैकी कोणत्या संघाला आयपीएल विजेता घोषित करणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये ढगांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ४ जूनपर्यंत गुजरातचा काही भाग, विशेषतः सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या काही भागांत वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास असू शकतो. तसेच खराब हवामानामुळं पुढील पाच दिवस समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या शक्यतेमुळं तापमानात ३ ते ५ अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम लढतीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळं हा अंतिम सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय निर्णय घेणार याबाबत जाणून घेऊयात.

आयपीएलच्या प्लेऑफ नियमानुसार, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला जातो. सामना पूर्ण खेळवण्यासाठी मुख्य दिवस आणि राखीव दिवसात प्रत्येकी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध असतो. पावसामुळं जर संपूर्ण सामना खेळवण्यात आला नाही तर, षटके कमी करून सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही संघांना किमान प्रत्येकी पाच षटके खेळणे गरजेचे असते. सामना सुरू झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्यास विजेता निश्चित करण्यासाठी डकवर्थ लुईस (DLS) नियम लागू केला जातो. अगदीच वेळ कमी असेल तर, सुपर ओव्हरच्या माध्यमातूनही अंतिम सामन्याचा निकाल निश्चित केला जातो.

आयपीएल प्लेऑफच्या नियमानुसार, कलम १६.११.२ प्रमाणे जर खराब हवामानामुळं मुख्य दिवस आणि राखीव दिवस किंवा सुपर ओव्हर खेळवणे शक्य झाले नाही तर, लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला आयपीएलचा विजेता घोषित करण्यात येतो.

यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन संघ आमनेसामने आहेत. दोन्ही दिवसांचा खेळ झाला नाही तर लीग स्टेजमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाला म्हणजेच बेंगळुरू संघाला विजेता घोषित करण्यात येईल. त्यामुळं सगळ्यांच्या नजरा आभाळाकडं लागलेल्या आहेत.

आयपीएल फायनलवर पावसाचे सावट, नियमानुसार कोण ठरणार विजेता संघ?
RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com