
आशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा भिडणार आहेत. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर केलेल्या आरोपावर सुनावणी पूर्ण झाली आहे. पीसीबीच्या तक्रारीनंतर आयसीसीने ही प्रक्रिया सुरु केली होती. १४ सप्टेंबर रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना झाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने हा सामना ऑपरेशन सिंदूरचा भाग असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना समर्पित केला. ज्यावर पीसीबीने आक्षेप घेत त्याला "राजकीय विधान" म्हटले आणि याची तक्रार आयसीसीकडे केली.
सूर्यकुमार यादवला आयसीसीचा इशारा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीनंतर आयसीसीने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीला, भारतीय कर्णधारासह बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लपूरकर हे देखील उपस्थित होते. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर सूर्यकुमार यादवला त्याच्या विधानाबद्दल अधिकृत इशारा दिला. रिचर्डसन यांनी बीसीसीआयला ईमेल पाठवून म्हटले आहे की, सूर्यकुमार यादव यांचे विधान खेळाच्या प्रतिमेवर परिणाम करू शकते, परंतु हा गंभीर गुन्हा नाही. तसेच, सूर्यकुमार यादव दोषी नसल्याचे म्हटले आहे.
कोणती शिक्षा मिळणार?
आयसीसीच्या नियमांनुसार, हे प्रकरण लेव्हल १ चे उल्लंघन मानले जाते. या लेव्हलचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जात नाही. परंतु, खेळाडूला सामना शुल्काचा दंड किंवा डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे, या प्रकरणाचा सूर्यकुमारचा फायनल सामना खेळण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. वृत्तानुसार, मॅच रेफरी रिचर्डसनने सूर्यकुमार यादवला भविष्यात कोणतीही राजकीय विधाने करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आता, सूर्यकुमार यादव कोणत्याही निर्बंधांशिवाय मैदानावर खेळताना दिसेल.
पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार
आशिया कप २०२५ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार आहे. २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.