धावांच्या पडलेल्या दुष्काळामुळं टीम इंडियाच्या बाहेर झालेला किंवा करण्यात आलेला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यानं जोरदार कमबॅक करतानाच, वादळी खेळी केलीय. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. जो संघ त्याच्यासमोर येतोय, त्याची पार दाणादाण उडवताना दिसतोय. याआधीच्या सामन्यात २१ चेंडूंत ६० धावांची तुफान खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही वादळी खेळीनं प्रतिस्पर्धी संघाला जोरदार तडाखा दिला आहे. या सामन्यात त्यानं २८३ च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत.
सूर्यकुमार यादव सध्या भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. खराब कामगिरीमुळं त्याला कर्णधारपदही गमवावं लागलं. तेव्हापासून तो प्रोफेशनल क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. बीसीसीआयच्या टी २० स्पर्धेत तर त्याची बॅट तळपतेय. स्थानिक स्पर्धेत तो मुंबईतून खेळला. त्यात त्याची कामगिरी बऱ्यापैकी झाली. पण सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा फडशा आणि धावांचा पाऊस पाडतोय. पहिल्या सामन्यात त्यानं अवघ्या २१ चेंडूंत ६० धावा तडकावल्या. तर दुसऱ्या सामन्यातही त्यानं स्फोटक खेळी केली.
पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाविरुद्ध त्यानं आक्रमक खेळी केली. ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने त्याने २१ चेंडूंत ६० धावा चोपल्या होत्या. २८५ पेक्षा जास्त त्याचा स्ट्राइक रेट होता. आता गुजरात संघाविरुद्ध त्यानं मोठी खेळी केली. २९ चेंडूंत त्यानं ९ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची तुफानी खेळी केली. त्याचा स्ट्राइक रेट २८३ इतका होता. मागील सामन्यातही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळीही त्यानं चौथ्या क्रमांकावर उतरून ही वादळी खेळी केली आहे.
मुंबईच्या संघानं गुजरातला १९७ धावांवर गारद केलं होतं. २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुजरातचा अखेरचा गडी बाद झाला होता. त्यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मुंबईच्या फलंदाजांनी हे लक्ष्य अवघ्या १६ व्या षटकातच गाठलं. मुंबईनं या स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडणारा सरफराज खान देखील चांगल्या लयीत दिसला. त्यानं १७ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. त्यात पाच चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. शिवम दुबे मात्र लयीत दिसला नाही. शार्दुल ठाकूर आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाबाहेर आहे. भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार कमबॅकसाठी झगडतोय. ८ मार्चला तो अखेरचा टी २० सामना खेळला होता. त्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. वर्ल्डकप फायनलचा सामना होता. त्याच्या नेतृत्वात भारतानं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला. वर्ल्डकप आणि आयपीएलमध्ये त्याची बॅट रुसली आणि धावाच काढता आल्या नाहीत. त्यामुळे त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थानही गमवावं लागलं. आता टीम इंडियात परतण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. या स्पर्धेतील आक्रमक खेळीनंतर सूर्यकुमारचा जलवा पुन्हा बघायला मिळाला आहे. आता त्याच्यासाठी टीम इंडियाचं दार उघडतं का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.