

बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याच्या बांगलादेशातील घरावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आलीये. घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. तसंच पेट्रोल बॉम्ब फेकून घराला आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.
विशेष म्हणजे याच दिवशी शाकिब अल हसन नवी दिल्लीत झालेल्या एका मीडिया कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमाला बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी संबोधित केलं होतं. या घटनेनंतर बांगलादेशात राजकीय वातावरणही तापलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मगुरा शहरातील केशब मोड परिसरात काही लोक शाकिबच्या घरासमोर जमा झाले. त्यांनी घरावर दगडफेक करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराला आग लावण्याचाही प्रयत्न झाल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आलीये. मात्र, हा हल्ला नेमका कोणी केला आणि त्यामागचं कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची चर्चा सुरू होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे शाकिबचा नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमातील सहभाग. बुधवारी तो शेख हसीना सहभागी असलेल्या मीडिया कार्यक्रमात उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यानंतर अवघ्या काही तासांतच मगुरातील त्याच्या घरावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला.
शाकिब अल हसन हा यापूर्वी मगुरा-१ मतदारसंघातून अवामी लीगचा खासदार राहिला आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नव्हे तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जातंय. मात्र हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या प्रकरणानंतर अवामी लीगने निवेदन जारी करत शाकिबच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याचा आरोप केलाय. पक्षाच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे शाकिबला लक्ष्य करण्यात आलं. तसंच, या कार्यक्रमापूर्वी काही राजकीय पक्षांनी माध्यम संस्थांना इशाराही दिला होता असा आरोप अवामी लीगने केलाय. हा हल्ला विरोधकांनी नियोजनपूर्वक घडवून आणल्याचाही दावा पक्षाने केला.
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली आणि आग लावण्याचा प्रयत्न झाला ही बाब समोर आलीये. मात्र पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याचा दावा केवळ अवामी लीगने केला असून त्याची अद्याप स्वतंत्र किंवा अधिकृत पातळीवर पुष्टी झालेली नाही.
या संपूर्ण प्रकरणात अनेक दावे आणि आरोप समोर येतायत. हल्ल्यामागचं खरं कारण काय यात नेमकं कोण सहभागी होतं आणि पेट्रोल बॉम्बचा वापर झाला होता का याचं स्पष्ट चित्र अद्याप समोर आलेलं नाही. तपास पुढे गेल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.