
काही लोक इतके ध्येय वेडे असतात की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावतात. पण हल्ली क्रिकेटवेडे तर एकदम कट्टर आहेत. त्यात आयपीएलची क्रेझ तर लय भारी! काही खेळाडूंवर तर इतका जीव असतो की त्याच्याविरोधात थोडं काही वेडंवाकडं बोललं की परका तर जाऊद्याच, आपल्या माणसावरही हात उगारायला मागेपुढे बघत नाहीत. बेंगळुरू संघावर विराटप्रेम करणाऱ्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. बेंगळुरू संघासाठी तर तिनं आपला संसारच पणाला लावला आहे. यंदा बेंगळुरू संघ फायनल जिंकला नाही तर नवऱ्याला घटस्फोट देणार असल्याचं ती म्हणतेय.
एकीकडं मे महिन्यातच पूर्वमोसमी पाऊस कोसळतोय. दुसरीकडं क्रिकेटच्या मैदानातही चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय. अलीकडे झालेल्या रोमहर्षक सामन्यांमुळं आयपीएलचा थरार वाढलाय. आता अखेरचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यात १८ व्या मोसमात तरी ट्रॉफीचा पडलेला दुष्काळ दूर होऊन विजयाचा गुलाल उधळला जाईल, अशी आशा बेंगळुरू संघासह कोट्यवधी चाहत्यांना आहे. सध्या बेंगळुरूचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे चाहते तर जबरदस्त जोशात आहेत. क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जला धूळ चारल्यानंतर आरसीबी संघ फायनलमध्ये धडकला आहे. तब्बल ९ वर्षांनंतर बेंगळुरू संघ आयपीएलची फायनल खेळणार आहे. त्याचवेळी जबरा फॅन असलेल्या महिलेने तर शपथच घेतली आहे. तिचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. बेंगळुरूचा संघ फायनल जिंकला नाही तर, नवऱ्याला घटस्फोट देईल, असं ती म्हणतेय.
२९ मे रोजी क्वालिफायर १ चा सामना झाला. बेंगळुरूनं पंजाबला ८ विकेटनं पराभूत केलं आणि फायनलमध्ये धडक दिली. त्याआधी आरसीबीचा संघ लीगमधील अंतिम सामना लखनऊमध्ये खेळला होता. हा सामना सुरू असताना एका महिलेनं हाती पोस्टर घेतला होता. त्या पोस्टरवरील मजकूर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. मैदानातील कॅमेरे त्या पोस्टरवरच्या मजकुरावर रोखले गेले. आता या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तर नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जर आरसीबी फायनल जिंकली नाही तर मी नवऱ्याला घटस्फोट देईल असा मजकूर या पोस्टरवर होता. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही क्रिकेट चाहत्यांना हसावं की रडावं हेच कळेना. तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला. दुसरीकडं असं काही व्हायरल झालं म्हणजे चर्चा तर होणारच! आरसीबी संघाचे कट्टर फॅन असलेल्यांनी तर महिलेचं कौतुक केलं. तर काहींनी यावर गंभीर चर्चा केली. क्रिकेटशी अशा प्रकारे आपलं खासगी आयुष्य जोडणं योग्य नाही, असा सल्ला काहींनी दिला.
यंदा बेंगळुरूचा संघ जोमात आहे. तर मुंबई वगळता बाकीचे दिग्गज संघ कोमात आहेत, असं काही चाहते म्हणताहेत. यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा प्रवास सुसाट आहे. लीग स्टेजमधील १४ पैकी ९ सामने जिंकून बेंगळुरूचा संघ १९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. तर पंजाबला पराभूत करून फायनलही गाठली आहे. ३ जून २०२५ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम लढत होईल. क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होईल. यातील विजेता संघाची गाठ बेंगळुरू संघाशी पडेल. आता फायनल कुणामध्ये होणार आणि विजेता कोण ठरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.