

mumbai indians suffer double injury blow in ipl 2026 : आयपीएल स्पर्धा रंगतदार स्थितीत आहे. प्लेऑफमध्ये तीन संघ पोहोचले आहेत. लीग स्टेज जवळपास संपत आली आहे. चौथा संघ कोणता असेल याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्याचवेळी आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पाच वेळा पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला तगडा झटका लागला आहे. एकाच वेळी संघातील दोन खेळाडू दुखापतीमुळं आयपीएलबाहेर झाले आहेत.
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांसारख्या तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. औपचारिकता म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ उर्वरित सामने खेळणार आहे. पण त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक आणि युवा ऑलराउंडर राज अंगद बावा हा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. खराब कामगिरीमुळं आधीच टीकेचे धनी ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील शेवट गोड व्हावा, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल. मात्र, या दुहेरी झटक्यामुळं पुन्हा चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सकडून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. क्विंटन डी कॉकच्या हाताला दुखापत झाली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्याआधी त्याला दुखापत झाली होती. तर राज अंगद बावा याला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहेत. आयपीएलच्या नियमानुसार लवकरच या दोन्ही खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात येईल, असे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले.
यंदाच्या आयपीएलमध्ये डी कॉकला मोजक्यात सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्याची सुरुवात जबरदस्त होती. तो केवळ तीन सामने खेळला. त्यात त्याने १३२ धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्ध त्याने नाबाद ११२ धावा कुटल्या. पण उर्वरित दोन डावांमध्ये त्याने अनुक्रमे १३ आणि ७ धावा केल्या.
राज अंगद बावा यालाही या मोसमात अधिक संधी मिळाली नाही. तीन सामन्यांत तो खेळला. फलंदाजीत त्याने अवघ्या १६ धावा केल्या. तर गोलंदाजीत २ विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सची कामगिरी या मोसमात निराशाजनक होती. १२ पैकी फक्त चार सामन्यांत विजय मिळवता आला. पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी घसरण झाली आहे. आता अखेरचे दोन सामने खेळायचे आहेत. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांविरुद्ध अस्तित्वाची लढाई असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.