

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापू्र्वी एक मोठी गोष्ट घडलीये. महत्त्वाच्या सामन्याच्या आदल्या रात्री न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने एक वेगळाच निर्णय घेतला. त्याने थेट न्यूझीलंडच्या चाहत्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रातून त्याने सामन्यापूर्वीची भावना, दबाव आणि चाहत्यांच्या पाठिंब्याचं महत्त्व नमूद केलंय.
सँटनरने आपल्या मेसेजमध्ये मान्य केलं की, भारतात खेळताना प्रचंड दबावाचा सामना करावा लागतो. त्याच्या मते, समोर तब्बल 1.4 बिलियन भारतीय चाहत्यांची ताकद उभी असते. सुमारे 1 लाख 30 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये प्रेक्षक टीम इंडियाला पाठिंबा देतील. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.
न्यूझीलंडमध्ये हा सामना सोमवारी पहाटे 2.30 वाजता सुरू होणार आहे. इतक्या लवकर उठून सामना पाहणं चाहत्यांसाठी काहीसं कठीण असू शकतं. याची जाणीव ठेवून सँटनरने त्यांना अलार्म लावून सामना पाहण्याची विनंती केलीये. आम्ही तुमच्यापासून हजारो किलोमीटर दूर असलो तरी तुम्ही पाठवलेले सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो आणि मेसेजेस आम्हाला मिळतात. त्यातून तुमचा आम्हाला किती पाठिंबा आहे हे दिसून येतं.
सँटनरने आपल्या मेसेजमध्ये चाहत्यांना एक मजेशीर सल्लाही दिला. जर हा सामना पाहताना सोमवारी ऑफिस किंवा शाळेत जायला उशीर झाला, तर माझा हा मेसेज तुमच्या बॉस किंवा शिक्षकांना दाखवा, असं त्याने म्हटलंय. चाहत्यांकडून मिळणारा हा उत्साह आणि प्रतिसादच आम्हाला मैदानावर अधिक जोमाने लढण्याची ताकद देतो, असंही त्याने नमूद केलंय.
आम्ही लवकरच मायदेशी परतू आणि परतताना सोबत थोडं ‘जास्तीचं सामान’ म्हणजेच वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन येऊ, असं आश्वासनही सँटनरने दिलंय. त्याच्या या संदेशामुळे न्यूझीलंडच्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे भारतीय चाहत्यांना मात्र घरच्या मैदानावर टीम इंडियाच विजय मिळवेल असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष सामन्यात काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.