Surabhi Jayashree Jagdish
८ मार्च हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे. कारण आज मेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६चा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खिताबासाठी लढत होणार आहे. याच मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आलीये.
न्यूझीलंड महिला टीममधील अनुभवी वेगवान गोलंदाज ली तहुहुने वनडे क्रिकेटमधून अचानक संन्यास जाहीर केलाय. या खेळाडूने आता वनडे फॉरमॅटला निरोप दिला आहे.
निवृत्ती जाहीर करताना तहुहु म्हणाली की, व्हाइट फर्न्सची जर्सी घालून वनडे खेळणं हा नेहमीच अभिमानाचा क्षण होता. एक सामना खेळण्याची संधी मिळाली तरी ते खास वाटत होतं. पण १०० पेक्षा जास्त सामन्यांत देशाचं प्रतिनिधित्व करणं हे स्वप्नासारखं होतं.
ली तहुहुने २०११ साली केवळ २० वर्षांच्या वयात न्यूझीलंडकडून वनडे पदार्पण केलं होतं. या फॉरमॅटमध्ये तिने एकूण १०३ सामने खेळत १२५ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड महिला टीमकडून वनडेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.
तहुहु ही न्यूझीलंड महिला टीमसाठी १०० हून अधिक वनडे सामने खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये आहे. कीवी टीमच्या इतिहासात अशा खेळाडूंची संख्या फारच कमी आहे.
तहुहुने २०१३, २०१७, २०२२ आणि २०२५ अशा चार वनडे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांमध्ये तिने एकूण ३६ विकेट्स घेतल्या. हा न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम विक्रम आहे.
३५ वर्षांच्या ली तहुहुने तब्बल १५ वर्षे न्यूझीलंडसाठी वनडे क्रिकेट खेळलंय. १०३ सामन्यांत १२५ विकेट्स घेत तिने टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. तिच्या नावावर एका डावात ५ विकेट्स आणि तीन वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरीही आहे.