

फिफा वर्ल्डकप 2026 चा फायनल सामना आज रंगणार आहे. मात्र या अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला मोठा धक्का बसलाय. स्पेनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात त्याच्याकडे अजूनही इतिहास घडवण्याची संधी असली तरी गोल्डन बूट जिंकण्याचा त्याचा मार्ग आता अधिक कठीण झालाय.
याचं कारण म्हणजे फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे गोल्डन बूटच्या शर्यतीत तसंच वर्ल्डकप इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही मेस्सीच्या पुढे गेलाय. त्यामुळे आजच्या सामन्यात मेस्सी काय कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या फ्रान्स आणि इंग्लंडमधील सामन्यात एम्बाप्पेने दोन गोल केले. हा सामना इंग्लंडने 6-4 अशा फरकाने जिंकला. मात्र या दोन गोलांमुळे एम्बाप्पेने पर्सनल रेकॉर्डच्या शर्यतीत मोठी झेप घेतलीये.
या वर्ल्डकपमध्ये मेस्सीने जर्मनीचा मिरोस्लाव क्लोझे याचा वर्ल्डकपमधील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला होता. उपांत्य फेरीपर्यंत तो 21 गोलांसह अव्वल स्थानावर होता. मात्र आता एम्बाप्पेने दोन गोलांची भर घालत एकूण 22 गोल केलेत आणि तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेस्सी 21 गोलांसह दुसऱ्या स्थानावर घसरलाय.
अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करून मेस्सीकडे पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्डकप असल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे.
सेमीफायनलनंतर गोल्डन बूटच्या शर्यतीतही मेस्सी अव्वल होता. मात्र तिसऱ्या स्थानाच्या सामन्यानंतर परिस्थिती बदलली. एम्बाप्पेने दोन गोल करत या स्पर्धेतील आपली गोलसंख्या 10 वर नेली आणि तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. मेस्सीच्या खात्यात सध्या 8 गोल आहेत.
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले असले तरी फिफा वर्ल्डकपमधील गोल्डन बूट पुरस्कार त्याला अद्याप एकदाही जिंकता आलेला नाही. हा पुरस्कार त्या वर्ल्डकपमधील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
मेस्सीकडे आता एकच संधी उरली आहे आणि ती म्हणजे स्पेनविरुद्धचा अंतिम सामना. एम्बाप्पे 10 गोलांसह आघाडीवर आहे तर मेस्सीच्या नावावर 8 गोल आहेत. गोल्डन बूट जिंकण्यासाठी मेस्सीला अंतिम सामन्यात किमान 3 गोल करावे लागतील. जर त्याने 2 गोल केले तर तो एम्बाप्पेच्या 10 गोलांच्या बरोबरीला पोहोचेल. अशा वेळी विजेता ठरवण्यासाठी असिस्टचा निकष लावला जाईल. सध्या मेस्सी आणि एम्बाप्पे या दोघांच्या नावावर प्रत्येकी 4 असिस्ट आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.