MI vs CSK 2026 match full highlights Sanju Samson century : आयपीएलमधील'एल् क्लॅसिको' म्हणजेच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना वानखेडेवर एकतर्फी झाला. चेन्नईपुढे मुंबईचा संघ ढेपाळला. चेन्नईने दिलेल्या २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव फक्त १०४ धावांवर संपुष्टात आला. चेन्नईने मुंबईचा तब्बल १०३ धावांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नईकडून संजू सॅमसन यानं वादळी शतक ठोकले. तर अकील हुसेन याने ४ विकेट घेतल्या.
मुंबईची खराब सुरुवात
२०८ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक अवघ्या ७ धावा काढून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेला नमन धीर याला खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय युवा Danish Malewar यालाही खाते उघडता आले नाही.
चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत मुंबईच्या धावगतीवर लगाम घातला. पॉवरप्लेमध्ये ३ महत्त्वाचे बळी गमावल्यामुळे मुंबईचा डाव अडचणीत सापडला होता. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धावगती कमी करण्याच्या प्रयत्नात दोघेही बाद झाले. सूर्यकुमार यादवने ३० आणि तिलकने ३५ धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. हार्दिक पांड्या आणि रूदरफोर्डही स्वस्तात माघारी परतले. मुंबईचे आघाडीचे ७ फलंदाज १३ षटकांच्या आतमध्येच तंबूत परतले होते. पहिल्या १० षटकानंतरच मुंबईचा पराभव निश्चित झाला होता. मुंबईचा संघ १०४ धावांत संपुष्टात आला. चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा संघाने लोटांगण घातले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक मारा केला. सुरुवातीच्या षटकांतच चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी चेंडूला मिळणारी स्विंग आणि अचूक टप्पा यांचा खुबीने वापर करून मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. चेन्नईच्या अकिल हुसेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ४ महत्त्वाच्या विकेट घेत मुंबईचे फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला फिरकीपटू नूर अहमदने २ बळी घेत मोलाची साथ दिली. तर वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरीने १ गडी बाद केला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन याने नाबाद १०१ धावांची झंझावाती खेळी केली. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात तशी संमिश्र राहिली. ऋतुराज गायकवाड (२२) आणि सर्फराज खान (१४) यांनी संजूसोबत आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. मधल्या फळीत शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस स्वस्तात बाद झाले. मात्र, एका बाजूने खिंड लढवत संजू सॅमसनने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी केली. त्याने आपल्या शतकी खेळीत १० चौकार आणि ६ षटकार ठोकले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारत त्याने आपले शतक पूर्ण केले आणि संघाला २०० पार नेले.
मुंबईचे गोलंदाज फ्लॉफ -
मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीला काही प्रमाणात अंकुश ठेवला होता. अल्लाह गझनफरने ४ षटकांत २५ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले. अनुभवी जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत १७ व्या षटकात केवळ २ धावा दिल्या आणि कार्तिक शर्माला बाद केले. अश्वनी कुमारने २ विकेट घेतल्या. तर मिचेल सँटनरला १ विकेट मिळाली. पण, हार्दिक पांड्या आणि क्रिश भगत यांची गोलंदाजी महागडी ठरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.