
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये आयपीएलची फायनल होणार आहे. यंदा प्रथमच आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. दोन्ही संघांनी अद्याप एकदाही विजेतेपद पटकावलेले नाही. मात्र, या फायनलआधी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आरसीबी संघाला मोठे झटके बसले आहेत. मॅच सुरू होण्याच्या काही तास आधीच नवी अपडेट आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅचविनर सलामीवीर फिल सॉल्ट आणि ऑलराउंडर टीम डेविड आजच्या सामन्यात खेळतील की नाही याबाबत शंका आहे. आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदार याबाबत अनभिज्ञ असल्याचे वृत्त आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांत आयपीएलची फायनल होणार आहे. या फायनल सामन्याआधी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला टीम डेविडच्या खेळण्याबाबत विचारणा केली असता, याबाबत काही कल्पना नाही असं तो म्हणाल्याचं सांगण्यात येत आहे.
अद्याप मला टीम डेविडबाबत कोणतीही कल्पना नाही. आज संध्याकाळपर्यंत त्याबाबत कळवण्यात येईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे, असे रजत पाटीदार म्हणाला. टीम डेविड हा मागील दोन सामने खेळला नाही. त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे. ऑलराउंडर डेविडच्या खेळण्याबाबत शंका असतानाच आणखी एक सलामीवीर फिल सॉल्टच्या खेळण्याबाबतही सस्पेन्स आहे. संघाच्या सराव सत्रात तो दिसला नाही. तो लवकरच पिता बनणार आहे. त्यामुळे तो मायदेशी गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फायनल सामन्याआधी ट्रेनिंग सेशनमध्ये सॉल्ट अनुपस्थित होता. त्यामुळे तो महत्वाचा फायनल सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. जर टीम डेविड आणि फिल सॉल्ट हे दोघेही फायनल सामना खेळू शकले नाहीत, तर हा संघासाठी मोठा झटका असणार आहे.
आरसीबीने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. याआधी तीन वेळा फायनलमध्ये पराभूत झाले आहेत. चौथ्यांदा त्यांनी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये ते फायनलमध्ये पराभूत झाले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याच इराद्याने ते मैदानात उतरतील. पहिल्यांदाच विजेतेपदाची चव चाखण्याची आरसीबीकडे संधी आहे. त्यामुळे मॅचविनर सॉल्ट आणि अष्टपैलू टीम डेविडच्या खेळण्याबाबत संभ्रम असणे ही संघासाठी धोक्याची घंटा आहे.
फायनलमध्ये पंजाब किंग्जशी लढत होणार आहे. आयपीएल २०२५ च्या लीग फेरीत ते अव्वल स्थानी होते. क्वालिफायरमध्ये त्यांना आरसीबीनेच पराभूत केले आहे. मात्र, क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जने तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत मुंबई इंडियन्सला धूळ चारली. त्यामुळे पंजाब किंग्जचं मनोबल वाढलं असून, ते किती धोकादायक ठरू शकतात याचा अंदाज एव्हाना आरसीबीला आला असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.