
आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. राजकीय स्तरातून या सामन्याला विरोध होत असून, आता पहलगाम हल्ल्यात जीव गमावणाऱ्या शुभम द्विवेदी याची पत्नी ऐशान्या द्विवेदीनंही विरोध दर्शवला आहे. बीसीसीआयनं या सामन्याला मंजुरी द्यायला नको होती, असं ती म्हणाली. या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन तिने देशातील नागरिकांना केले आहे.
यावेळी ऐशान्या द्विवेदीनं बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटपटूंवरही निशाणा साधला. बीसीसीआय त्या २६ कुटुंबीयांच्या बद्दल भावुक नाही. आमचे क्रिकेटपटू काय करत आहेत? ज्या क्रिकेटपटूंना आपण राष्ट्रवादी समजतो, त्यांनी यावर आवाज उठवायला हवा होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालायला हवा, यासाठी दुर्दैवाने एक-दोन क्रिकेटपटू सोडले तर कुणीही पुढे आले नाही, असंही ती म्हणाली.
ऐशान्या द्विवेदी म्हणाली की, बंदुकीच्या निशाण्यावर बीसीसीआय कुणावरही खेळण्यासाठी दबाव आणू शकत नाही. आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी त्यांना समजायला हवी. त्यासाठी खंबीरपणे पाठिशी उभं राहायला हवं. पण दुर्दैवाने ते असे करू शकले नाहीत.
या सामन्यातून जी कमाई होते तिचा वापर कुठे करण्यात येईल? पाकिस्तान तो पैसा फक्त अन् फक्त दहशतवादावर खर्च करेल. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. आपण त्यांना पैसे मिळवून देऊ आणि ते आपल्यावर पुन्हा हल्ला करण्यासाठी तयार होतील. या सामन्यावर बहिष्कार घाला. हा सामना बघण्यासाठी जाऊ नका. टीव्ही बंद ठेवा, असं आवाहन मी भारतातील नागरिकांना करते, असंही ऐशान्या म्हणाली.
आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज अर्थात FWICE ने देखील विरोध दर्शवला आहे. या संघटनेने सोनी टीव्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. हा सामना भारतात दाखवण्यात येऊ नये, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.