

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या भवितव्याबाबत आयपीएल 2026 नंतर अनेक चर्चा सुरू आहेत. हार्दिक मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा असून तो पुढच्या सिझनमध्ये कोणत्या टीमकडून खेळणार याबाबतही वेगवेगळे दावे केले जातायत. आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याला त्याची जुनी टीम गुजरात टायटन्समध्ये जायचं होतं. मात्र गुजरात टायटन्सने त्याची ही मागणी मान्य केली नाही. गुजरातमध्ये परतताना हार्दिकने टीमचं कर्णधारपद आपल्याकडेच असावं, अशी अट ठेवली होती. याच कारणामुळे त्याचा हा प्लान फिस्कटला असल्याची चर्चा आहे.
हार्दिक पंड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्याच सिझनमध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर 2024 मध्ये तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला. मात्र आता मुंबई सोडण्याच्या चर्चांदरम्यान त्याने गुजरातमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्स हार्दिकला टीममध्ये पुन्हा घेण्यास तयार होती. याबाबत सध्याचा कर्णधार शुभमन गिल याच्याशीही चर्चा करण्यात आली होती आणि गिललाही हार्दिकच्या कमबॅकमुळे हरकत नव्हती. मात्र त्यानंतर हार्दिककडून कर्णधारपदाची मागणी करण्यात आली. ही अट समोर आल्यानंतर गुजरात टायटन्सने त्याचा प्रस्ताव नाकारला.
या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, गुजरात टायटन्स हार्दिकच्या कमबॅकसाठी तयार होती. याबाबत शुभमन गिलशी चर्चा झाली होती आणि तोदेखील यासाठी तयार होता. मात्र हार्दिकने कर्णधारपदाची अट ठेवल्यानंतर सर्वांनी त्याला नकार दिला.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या प्रवक्त्याने या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, हार्दिकने आतापर्यंत कोणत्याही फ्रँचायझीसोबत ट्रेड किंवा ट्रान्सफरबाबत थेट चर्चा केलेली नाही. तसंच कोणत्याही फ्रँचायझीने हार्दिकशी थेट संपर्क साधलेला नाही. हार्दिकशी एखाद्या फ्रँचायझीला याबाबत चर्चा करायची असेल तर त्यांना मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलंय.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये पुढच्या सिझनमध्ये कर्णधार म्हणून कायम राहणार नसल्याची चर्चा यापूर्वीच सुरू झाली होती. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संघाने 14 पैकी तब्बल 10 सामने गमावले आणि सिझनच्या अखेरीस पॉईंट्स टेबलवर नवव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत चर्चा आणखी वाढली.
दरम्यान आता हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये राहणार की, ट्रेडच्या माध्यमातून दुसऱ्या टीममध्ये जाणार याकडे आयपीएल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. गुजरात टायटन्समध्ये परतण्याचा पर्याय त्याच्यासमोर होता मात्र कर्णधारपदाच्या अटीमुळे ही शक्यता सध्या फिस्कटली असल्याचं चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.