Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

From Streets to Power Why Mamata Banerjee Prefers Walking Over Roadshows: “ममता दीदी सतत चालत का राहतात?” काय आहे ममता बॅनर्जींचं रस्त्यावर चालण्याचं रहस्य? जाणून घेऊया डी-कोडमध्ये...
Mamata Banerjee /social media
Mamata Banerjee /social mediasaam tv
Published On

बंगालच्या कडक उन्हाची झळ. बहरामपूरच्या रस्त्यांवर उसळलेली प्रचंड गर्दी. ममता बॅनर्जी यांच्या टीमने सांगितले, “दीदी, यावेळी ट्रकवर चढून रोडशो करूया… 15 किलोमीटर चालणे आपल्याला कठीण जाईल.” दीदी हसत म्हणाल्या—“आमी हांटबो.. मी चालणार.” आणि मग पाठदुखी, सपोर्ट बेल्ट, थकवा—सगळं विसरून त्या लोकांमध्ये चालू लागल्या. त्यांच्याशी हस्तआंदोलन करत, त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून संवाद साधत.

हे काही पहिल्यांदाच नव्हतं. वर्षानुवर्षे ममता बॅनर्जीच्या राजकारणाचा एकच मंत्र राहिलाय —रस्त्यावर चला, लोकांमध्ये राहा. कधी विद्यार्थी राजकारणात, कधी विरोधात, आणि आता तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतरही दीदींनी रस्त्यावरच राजकारण सोडलेल नाही. त्यांचे एक जुने सहकारी नेहमी म्हणायचे—“जर ममताला रस्त्यावर उतरू दिलं, तर त्यांना हरवणं कठीण आहे.” फक्त साधी साडी, स्लिपर आणि सामान्य लोकांची भाषा.

जिथे आधी ज्योती बसू आणि बुद्धदेब भट्टाचार्यजी सारखे नेते मंचावरून सज्जनांची भाषा बोलायचे, तिथे दीदी थेट लोकांच्या भावनांना हात घालतात. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी बंगलमध्ये ममता दीदींच्या काही सभा कव्हर केल्या. एकाही सभेत ममता दीदी मंचावर एका जागेवर स्थिर उभं राहून बोलत नव्हत्या. TMC पक्षाचं चिन्ह असलेला माईक घेऊन त्या स्टेजच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत चालत जनतेशी संवाद साधत होत्या. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी- बंगालला हवी स्वतःचीच मुलगी- हा नारा दिला आणि बंगाली जनतेने त्यांना भरघोस कौल दिला. 2011 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या, तेव्हा लोकांना वाटलं.

“या फक्त आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत…” पण त्यांनी 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून सगळ्यांना आश्चर्यचा धक्का दिला. रस्त्यावरचं राजकारण करताना रस्त्यावरील लोकांना काय हवंय हे त्यांना पक्क माहित होतं त्यामुळेच त्यांनी अर्थतज्ज्ञ अमित मित्रा यांना सोबत घेतलं आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू केला. मुलींच्या शिक्षणासाठी कन्याश्री, महिलांना आर्थिक मदतीसाठी लक्ष्मी भंडार, विद्यार्थ्यांसाठी सायकल देणारी सबुज साथी योजना, मोफत उपचारासाठी स्वास्थ्य साथी…आणि या योजनांच्या बळावर महिलाच त्यांची सर्वात मोठी ताकद बनल्या. पण 15 वर्षांच्या सत्तेनंतर सगळं काही सोपं राहिलेलं नाही. भ्रष्टाचाराचे आरोप, टीएमसी नेत्यांचं अटकसत्र, कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह आणि सर्वात महत्त्वाचं—सत्ताविरोधी लाट.

आता लढाई फक्त विरोधकांशी नाही, तर जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याची आहे. पण त्यासाठी त्यांनी रणनीती बदलली असली तरी जिद्द मात्र तशीच आहे. बंगालमध्ये जसा भाजपचा प्रभाव वाढला, तशी दीदींनी आपली राजकारणाची दिशा बदलली. त्यांनी “बंगाली अस्मितेचं राजकारण सुरू केलं. ” आणि भाजपविरोधात बाहेरील शक्ती असं नरेंटिव्ह सेट केलं. त्यासाठी त्यांनी कधी माश्याच्या आहाराचा तर कधी भाषेचा मुद्दा पुढे करून भाजपला घेरलं. कारण त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही—तर चालत राहणं, लढत राहणं आणि लोकांशी जुळत राहणं हेच आहे. जेव्हा इतर नेते मंचावरून बोलतात, त्या रस्त्यावर उतरतात. जेव्हा त्याच्यावर जास्त टीका होते तेव्हा त्या आणखी आक्रमकपणे सक्रिय होतात. बेहरामपूरची 15 किलोमीटरची पायी रॅली हाच त्यांच्या राजकारणाचा DNA आहे. कारण दीदींना माहिती आहे—त्यांची खरी ताकद सत्ता नाही, तर रस्ता आहे. आणि म्हणून त्या स्टेज असो की रास्ता चालतच राहतात.

Mamata Banerjee /social media
Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com