
देशातील वेगवान आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली वंदे भारत एक्सप्रेस आता आणखी एका शहरात थांबणार आहे. गुजरातमधील वलसाड शहराला वंदे भारत ट्रेनचा थांबा मिळणार असून, ही बातमी स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत आनंददायक आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता वलसाड स्थानकावर थांबणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने याबाबत अधिकृत सर्कुलर प्रसिद्ध केले असून, मुंबई सेंट्रल - गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस (20901/20902) ला वलसाड स्थानकावर थांबण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना वलसाड स्थानकावरील तिकीट विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन धावत असून, त्या चेअर कार सेवेसह प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांसह सेवा देत आहेत. त्यापैकी एक ट्रेन मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर धावते. या ट्रेनचे सध्याचे थांबे मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सुरत, आणंद, वडोदरा, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे आहेत. आता वलसाड स्थानकाचा या यादीत समावेश होणार आहे. वलसाडच्या प्रवाशांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.
वलसाडचे खासदार धवल पटेल यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. या नव्या थांब्यामुळे वलसाड आणि त्यासोबतच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासाचा वेळही वाचणार असून, आरामदायक प्रवासासाठी एक उत्तम पर्याय मिळणार आहे.
वलसाड स्थानकावर ट्रेन कोणत्या वेळेस थांबेल, हे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या निर्णयामुळे गुजरातमधील प्रवाशांची वंदे भारत कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.