इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची UGC NET ची फेरपरीक्षा
प्रश्नपत्रिकांमधील चुका, चुकीचे पर्याय आणि भाषिक चुकांबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी
तीन विषयांच्या फेरपरीक्षेचे नवीन वेळापत्रक अद्याप जाहीर नाही
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) यूजीसी-नेट जून 2026 परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका, चुकीचे पर्याय तसेच भाषेशी संबंधित त्रुटी असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय NTA ने जाहीर केला.
यूजीसी-नेट जून 2026 परीक्षा 22 ते 30 जूनदरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. एकूण 87 विषयांची ही परीक्षा होती. देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता तसेच पीएचडी प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. परीक्षा झाल्यानंतर इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. काही प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय देण्यात आल्याचे, तर काही प्रश्नांच्या भाषेतही चुका असल्याच्या तक्रारी NTA कडे करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर संबंधित तीन विषयांची परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, NTA ने 84 विषयांची प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर केली आहे. मात्र इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या विषयांची आन्सर-की अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या तीन विषयांच्या फेरपरीक्षेबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. जाहीर झालेल्या आन्सर-कीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक प्रश्नासाठी आक्षेप नोंदवताना 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे.
इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आता फेरपरीक्षेसाठी वाट पाहावी लागणार आहे. NTA कडून नवीन परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र आणि इतर आवश्यक सूचना अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.