
प्रेमात कोण कुणासाठी जीव देतं तर कोण कुणाचा जीव घेतो अशा अनेक घटना आपण पाहतो. पण प्रेमामध्ये वेडं होऊन एका व्यक्तीने आपल्या आवडत्या तरुणीच्या मृतदेहासोबत बरीच वर्षे घालवले असे जर तुम्हाला सांगितले तर तुमचाही विश्वास बसणार नाही ना. पण हे खरं आहे. एक डॉक्टर एका तरुणीच्या प्रेमात पडला. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पेशंट होती. उपचारादरम्यान तो तिच्या प्रेमात पडला पण नंतर तिचा मृत्यू होता आणि या डॉक्टराला मोठा धक्का बसतो. तो तिच्या मृतदेहासोबत बरीच वर्षे राहतो.
ही घटना आहे १९३१ सालची. १९३१ मध्ये २२ वर्षीय एलेना डी होयोसला टीबी होतो. तिला उपचारासाठी फ्लोरिडाच्या मरीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिची भेट कार्ल टॅन्झलरशी होते जो रेडिओलॉजिक तज्ज्ञ होता. त्याने स्वतःची ओळख काउंट कार्ल वॉन कोझेल अशी करून दिली. टँझलरने दावा केला की, त्याने लहानपणी स्वप्नात एक काळ्या केसांची स्त्री पाहिली होती. जी त्याची खरी प्रेयसी होती. त्याने तिला एलेनामध्ये पाहिले.
कार्ल टॅन्झलरने एलेनाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने तिच्यावर अनेक उपचार देखील केले. तिला घरगुती टॉनिक ही दिले. त्याने एलेना समोर आपले प्रेम व्यक्त केले पण एलेनाने कधीही त्याला स्वीकारले नाही. अखेर २५ ऑक्टोबर १९३१ रोजी एलेनाचा मृत्यू होतो. कार्लने एलेनाच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च उचलला आणि स्वतःच्या खर्चाने एक मकबरा बांधली. ज्याच्या चाव्या फक्त त्याच्याकडेच होत्या.
कार्ल दररोज रात्री मकबराला भेट देऊ लागला. तो तिथे भेटवस्तू ठेवत असे आणि एलेना आहे असं समजून तिच्याशी बोलत असे. त्याने त्याठिकाणी एक टेलिफोनही बसवला होता. त्याने दावा केला की, यामाध्यमातून तो एलेनाच्या आत्म्याशी बोलू शकत होता. १९३३ मध्ये एलेनाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी कार्ल टँझलरने गुपचूप एलेनाचा मृतदेह बाहेर काढला. एलेनाचा मृतदेह तो त्याच्या घरी घेऊन गेला. पुढचे ७ वर्षे तो एलेनाच्या मृतदेहासोबत एका माणसाप्रमाणे राहू लागला. जणू काय एलेना जिवंत आहे असे त्याला वाटत होते.
त्याने एलेनाचा मृतदेह जपून ठेवला. कोटच्या हँगर आणि वायरने एलेनाच्या मृतदेहाची हाडे एकत्र जोडली. त्यानंतर मेण आणि प्लास्टरने एलेनाचा चेहरा तयार केला. त्याने डोळ्यांत काचेचे डोळे लावले. त्याने एलेनाच्या खऱ्या केसांपासून विग बनवला. परफ्यूम आणि रसायनांनी मृतदेहाची दुर्गंधी दूर केली. त्याने एलेनाच्या मृतदेहाला सजवले त्यावर दागिने घातले. त्यानंतर त्याने एलेनाचा मृतदेह स्वतःच्या पलंगावर ठेवला.
१९४० मध्ये एलेनाच्या बहिणीला संशय आला आणि ती सत्य उघड करण्यासाठी कार्लच्या घरी गेली. तिथे तिला एलेनाचा विकृत पण चांगले कपडे घातलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कार्ल टँझलरला कबरीतून मृतदेह चोरल्याबद्दल अटक करण्यात आली होती. परंतु मर्यादांच्या कायद्यामुळे त्याच्यावर कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काळातील अमेरिकन नागरिक टँझलरला खरा प्रेमी मानत होते. वर्तमानपत्रांमध्ये त्याला 'शोकांतिकेचा प्रेमी' म्हणून म्हटले गेले.
एलेनाचा मृतदेह एकदा अंत्यसंस्कार गृहात जनतेसमोर दाखवण्यात आला होता. जिथे ६,००० लोक उपस्थित होते. नंतर एलेनाचा मृतदेह एका गुप्त कबरीत पुरण्यात आला जेणेकरून कोणीही तिचा मृतदेह परत बाहेर काढू नये. १९५२ मध्ये कार्ल टँझलर यांचे निधन झाले. असे म्हटले जाते की त्यांच्या मृत्यूच्या वेळीही त्यांच्यासोबत एलेनासारखी दिसणारी एक मोठी बाहुली होती. या प्रेम कहाणीची आजही अमेरिकेत चर्चा होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.