Russia Plague Scare Update : कोरोनाच्या भीषण संकटातून जग सावरले. पण आता रशियातून एका नव्या संसर्गाची बातमी समोर आल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियातील सिबेरिया भागातील एका रिसर्च लॅबमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा 'न्यूमोनिक प्लेग'च्या (Pneumonic Plague) संशयास्पद संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. लॅबमध्ये नमुने गोळा करताना टेस्ट ट्यूब फुटल्याने तिला हा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर रशियन प्रशासनाने तातडीने पावले उचलत परिसर सील केला. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या जवळजवळ २०० लोकांना क्वारंटाईन केले आहे. न्यूमोनिक प्लेग हा कोरोनासारखाच हवेतून आणि श्वसनाद्वारे वेगाने पसरत असल्याने रशियात मोठी खबरदारी घेतली जात आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS आणि CNN यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
रशियन अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा मृत्यू न्यूमोनिक प्लेगमुळे झाल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. या आजाराचे वर्णन "धोकादायक संसर्ग" आणि "अज्ञात कारणांमुळे" झालेला न्यूमोनिया असे केले आहे. इर्कुत्स्कजवळील शेलेखोव्ह येथील इर्कुत्स्क प्लेग विरोधी संशोधन संस्थेत ही घटना घडली.
'द मॉस्को टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, २७ वर्षीय प्रयोगशाळा कर्मचाऱ्याला मंगळवारी तीव्र न्यूमोनिया झाल्याने शेलेखोव्ह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि गुरुवारी तिचा मृत्यू झाला. अहवालानुसार, चाचणीसाठी नमुने गोळा करत असताना त्या महिलेकडून जिवंत जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब चुकून फुटली असावी.
'न्यूमोनिक प्लेग' आहे का?
रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार संसर्गाचे नेमके स्वरूप अजून स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे याला संशयित 'न्यूमोनिक प्लेग' म्हणत आहेत, तर रशियन आरोग्य संस्था आणि अधिकारी याला "अज्ञात कारणांमुळे झालेला गंभीर न्यूमोनिया" आणि "अत्यंत धोकादायक संसर्ग" असे म्हणत आहेत. रोस्पोट्रेबनाडझोरचे माजी प्रमुख गेनाडी ओनिशचेन्को यांच्या मते, हा संसर्ग बहुधा प्लेग नसावा. जरी तो प्लेग असल्याचे सिद्ध झाले, तरी हा आजार सर्वत्र पसरण्याचा धोका नाही.
'न्यूमोनिक प्लेग' म्हणजे काय?
हा संसर्ग 'येरसिनिया पेस्टिस' (Yersinia pestis) नावाच्या धोकादायक जिवाणूमुळे होतो. प्लेगच्या तीन मुख्य प्रकारांपैकी हा एक अतिशय गंभीर प्रकार मानला जातो. नेहमीचा ब्युबोनिक प्लेग हा पिसवांपासून किंवा प्राण्यांपासून पसरतो. मात्र, न्यूमोनिक प्लेग थेट फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि रुग्णाच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून निघणाऱ्या हवेतील कणांद्वारे (Droplets) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरू शकतो.
न्यूमोनिक प्लेगची प्रमुख लक्षणे (Symptoms):
अहवाल आणि यूएस CDC च्या माहितीनुसार, तीव्र ताप, डोकेदुखी आणि शरीरात अचानक अशक्तपणा येणे ही सुरूवातीची लक्षणे आहेत. तर वेगाने वाढणारा न्यूमोनिया, श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे, छातीत तीव्र वेदना होणे सतत खोकला येणे आणि खोकल्यावाटे थुंकीतून रक्त किंवा पांढरा पाणीदार कफ पडणे ही गंभीर लक्षणे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.