दोन वेळा एका मताने विजय, तिसऱ्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट; निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा

Rajasthan Sarpanch Election: राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात सरपंच निवडणुकीच्या मतमोजणीवरून तीन ग्रामपंचायतींमध्ये मोठा गोंधळ झाला. दर्र बराहना येथे तिसऱ्यांदा मतमोजणी झाल्यानंतर विमला कुमारी यांचा विजयाचा फरक एका मतावरून 13 मतांवर पोहोचला.
RAJASTHAN SARPANCH ELECTION
RAJASTHAN SARPANCH ELECTIONsaam tv
Published On: 

राजस्थानमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ उडालाय. धौलपूर जिल्ह्यातील बयाना पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तीन ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीवरून जोरदार राडा झाला. दर्र बराहना येथे मतांच्या मोजणीवरून वाद निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. तर खेड़ली गडासिया येथे संतप्त समर्थकांनी मतदान केंद्रालाच टाळं ठोकलं. बागरैनमध्ये विजयी उमेदवारालाच शाळेत रोखून धरण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलिस आणि प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला.

RAJASTHAN SARPANCH ELECTION
Shocking : नागपूरच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत! माकडाकडून बॅग घ्यायला गेले अन् १५० फूट खोल दरीत कोसळले

दर्र बराहना ग्रामपंचायतीत मतमोजणीवरून वाद

धौलपूर जिल्ह्यातील दर्र बराहना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान पोलिंग पथकाने दोन वेळा मतांची मोजणी केली. त्यानंतर विमला कुमारी यांना एका मताने विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तीन मतांची मोजणी कमी झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मतदान केंद्राबाहेर जमा झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.

RAJASTHAN SARPANCH ELECTION
Election Result : आजीच्या पराभवाचा घेतला बदला; काँग्रेस नेत्याच्या सुनेला २१ वर्षांच्या नातीने हरवले

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर एसडीएम अलका श्रीवास्तव यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर बयाना एसडीएम कार्यालयात पुन्हा मतमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी पहाटे मतपेट्या एसडीएम कार्यालयात आणण्यात आल्या. व्हिडिओग्राफीच्या देखरेखीखाली तिसऱ्यांदा मतमोजणी करण्यात आली. यामध्ये विमला कुमारी यांना 883, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कविता कुमारी यांना 870 मतं मिळाली. त्यामुळे आधी एका मताने विजयी झालेल्या विमला कुमारी यांचा विजयाचा फरक 13 मतांवर पोहोचला.

RAJASTHAN SARPANCH ELECTION
PG Medical Seats : डॉक्टर बनण्याचे स्वप्न होणार पूर्ण! महाराष्ट्रात हजारो पीजी मेडिकल सीटची भर, कोणत्या कॉलेजमध्ये वाढल्या सर्वाधिक जागा?

खेड़ली गडासिया येथे 45 मतांनी पराभव, समर्थकांचा मतदान केंद्राला टाळा

खेड़ली गडासिया ग्रामपंचायतीमध्ये आरती कुमारी यांना 45 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार बबली सिंह यांच्या समर्थकांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. संतप्त समर्थकांनी थेट मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं. मतांची मोजणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बागरैनमध्ये विजयी उमेदवाराला शाळेत रोखलं

बागरैन ग्रामपंचायतीमध्ये अमर सिंह यांना 1,135 मतं मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 141 मतांनी पराभव केला. मात्र, निकाल जाहीर होताच विरोधी गटातील लोकांनी आक्षेप घेतला. संतप्त लोकांनी विजयी उमेदवार अमर सिंह यांना मतमोजणी केंद्र असलेल्या शाळेतच रोखून धरलं. त्यांना घरी जाण्यापासून रोखण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात दोन्ही बाजूंना समजावण्यात आलं. त्यानंतर अमर सिंह यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आलं. दरम्यान, राजस्थानमधील या तीन ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे निवडणूक निकाल प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे दर्र बराहना येथे पुनर्मतमोजणीनंतर विजयाचं अंतर एका मतावरून थेट 13 मतांवर पोहोचल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.