पुण्यात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आपण यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पेपर लीक, रखडलेल्या सरकारी भरती, महागडे शिक्षण, खराब हॉस्टेल व्यवस्था, निकृष्ट अन्न आणि DBT मधील कथित गैरप्रकार यांसारख्या समस्या आपल्यासमोर मांडल्या होत्या, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यावेळी आपण MPSCमध्ये सुधारणा करण्याची आणि परीक्षा व्यवस्था पारदर्शक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे आता हेच विद्यार्थी पुण्यात आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी प्रामाणिक आणि पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच ७० हजारांहून अधिक रिक्त सरकारी पदे तातडीने भरावीत, या मागण्यांचा समावेश असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
या मागण्या अवाजवी नसून त्यावर आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. MPSC च्या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सत्याग्रहाच्या माध्यमातून नोंदवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, युवा काँग्रेस आणि NSUI विद्यार्थ्यांच्या आंदोलनासोबत सातत्याने उभे आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढत राहण्याच्या सूचना दिल्याचं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
मी हा मुद्दा महाराष्ट्र सरकारसमोर पुन्हा मांडून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करणार आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या संस्थेवर कब्जा करण्यात आल्याचा आरोप करत, आम्ही हे असंच चालू देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.