

NEET - UG 2026 परीक्षा पेपर फुटीचा तपास सीबीआयकडून सुरू असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला आहे. नीट पेपरफुटीवर संताप व्यक्त करतानाच, त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नीट परीक्षा दिलेल्या २२ लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा किंवा त्यांना तातडीने बरखास्त करावे, असे राहुल म्हणाले.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. नीट परीक्षेसाठी गेल्या दोन वर्षांत २२ लाख विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केली. पण त्यांचे कष्ट वाया गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
परीक्षेच्या दोन दिवस आधीच सोशल मीडियावर नीट पेपर फॉरवर्ड केले जात असल्याचे अख्ख्या देशाला ठाऊक होते. पण माझा याच्याशी काहीही संबंध नाही असं देशाचे शिक्षण मंत्री म्हणतात, असं राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षाचे लोक समितीत असावेत, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली होती. पण त्याला सरकारने केराची टोपली दाखवली. याची काहीही आवश्यकता नाही असे सांगितले गेले. हे एक मोठं जाळं आहे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी यावेळी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केला. या देशात ८० वेळा पेपर फुटले आणि जवळपास २ कोटी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. पंतप्रधानांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणातील दोषींना पकडून तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी आग्रही मागणीही राहुल गांधी यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.