FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Pan masala packaging rules: FSSAIच्या नव्या नियमांनुसार पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. प्लास्टिक पाउचऐवजी कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज, टिन आणि काचेचा वापर करावा लागणार आहे. पान मसाल्यावर बंदी नाही; नियम फक्त पॅकिंगशी संबंधित आहेत.
Pan masala packaging rules
Pan masala packaging rulessaam tv
Published On

दुकानात मिळणाऱ्या पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये आता मोठा बदल होणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पान मसाल्याच्या पॅकिंगसंदर्भात नियम बदललेत. नव्या नियमांनुसार पान मसाला आता नेहमीप्रमाणे प्लास्टिकच्या पाउचमध्ये विकता येणार नाही. कंपन्यांना प्लास्टिकमुक्त आणि सुरक्षित पॅकिंगचा वापर करावा लागणार आहे.

सरकारी अधिसूचनेनुसार, या बदलाचा परिणाम बाजारात मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या पाउचवर होणार आहे.

पान मसाला कशामध्ये पॅक करता येणार?

नव्या नियमांनुसार कंपन्यांना पान मसाल्याच्या पॅकिंगसाठी काही ठरावीक पर्यायच वापरता येणार आहेत. प्लास्टिकचा कोणताही वापर नसलेला कागद, पेपरबोर्ड किंवा सेल्युलोज यामध्ये पान मसाला पॅक करता येईल. याशिवाय टिनचे डबे आणि काचेच्या बाटल्यांमध्येही पान मसाला विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.

म्हणजेच, आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या छोट्या पाउचऐवजी आता कागद, टिन किंवा काच यांसारख्या पर्यायांचा वापर करावा लागणार आहे.

Pan masala packaging rules
Accident News : मध्यरात्री टँकरची ऑटोला धडक, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू, ७ जणांची प्रकृती गंभीर

कोणत्या गोष्टींना बंदी?

नव्या नियमांमध्ये पॅकिंगसाठी पॉलीथीन, पॉलिएस्टर, पीव्हीसी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सिंथेटिक प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आलीये. अनेकदा पॅकेटच्या बाहेर कागदाचा थर असतो, पण त्याच्या आत प्लास्टिक किंवा चमकदार एल्युमिनियम फॉइलचा थर दिलेला असतो. अशा प्रकारच्या मिश्र पॅकिंगलाही आता परवानगी नसणार आहे. म्हणजेच कागदाच्या पॅकेटच्या आत लपून प्लास्टिक किंवा धातूचा थर वापरता येणार नाही.

FSSAIने हा बदल का केला?

FSSAIने पान मसाल्याला पहिल्यांदाच पॅकेजिंगच्या नियमांमध्ये समाविष्ट केलंय. पान मसाल्याच्या पॅकिंगसाठी कोणत्या वस्तू वापरता येतील आणि कोणत्या वापरता येणार नाहीत, हे या नियमांमधून स्पष्ट करण्यात आलंय. हा बदल फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन्स 2026 अंतर्गत करण्यात आला आहे.

पान मसाल्याचे छोटे-छोटे प्लास्टिक पाउच रस्त्यावर, गटारांमध्ये आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेकले जातात. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या वाढते. हे पाउच नाल्या-गटारांमध्ये अडकून पाण्याचा प्रवाह रोखू शकतात आणि बराच काळ सहज नष्ट होत नाहीत.

Pan masala packaging rules
Accident News : मध्यरात्री टँकरची ऑटोला धडक, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू, ७ जणांची प्रकृती गंभीर

या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. प्लास्टिकऐवजी कागद, टिन किंवा काचेचा वापर वाढल्यास प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर पॅकिंगच्या साहित्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर होणारा परिणामही कमी करण्याचा प्रयत्न या नव्या नियमांमधून करण्यात आला आहे

पान मसाल्यावर बंदी आली आहे का?

पान मसाल्याच्या विक्रीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. हा निर्णय फक्त त्याच्या पॅकिंगशी संबंधित आहे. कंपन्यांना पान मसाल्याची विक्री सुरू ठेवता येणार आहे. मात्र त्यासाठी पॅकिंगची पद्धत नव्या नियमांनुसार बदलावी लागेल. नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाऊ शकते

दरम्यान हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. FSSAIने एप्रिलमध्ये या बदलांचा मसुदा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर 60 दिवसांचा कालावधी देऊन नागरिक, व्यापारी आणि संबंधित उद्योगांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.

Pan masala packaging rules
Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

या कालावधीत आलेल्या सूचना आणि विविध पक्षांची मते विचारात घेतल्यानंतर अंतिम नियम तयार करण्यात आले. हे नियम 10 ऑगस्ट रोजी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर लागू झाले आहेत. त्यामुळे आता बाजारात पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये हळूहळू मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्लास्टिकच्या छोट्या पाउचऐवजी कागद, टिन आणि काचेचा वापर वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com