
अवघ्या ४८ तासांत पाकिस्तानच्या बेताल राज्यकर्त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि भारतासोबत थेट जगाला संपवण्याची भाषा केली. पण आंतराष्ट्रीय समुदायानं मात्र यावर चक्कार शब्द काढलेला नाही. कोणाच्या बळावर पाकची मस्ती वाढलीय हे आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून...
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानं भांबावलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी पुन्हा उसन्या डरकाळ्या द्यायला सुरूवात केलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा पारंपारिक शत्रू पाकिस्तानची दाढी कुरवाळायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पाकिस्तानच्या एक नव्हे तर तीन तीन राज्यकर्त्यांनी आपल्या बेटकुळ्या फुगवत भारताला धमकावलंय.
- ११ ऑगस्ट २०२५
पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीर
पाकिस्तानवर अस्तित्वाचं संकट आलं तर पाकिस्तान अर्ध्या जगाला सोबत घेऊन बुडवेल.
- १२ ऑगस्ट २०२५
पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुट्टो
भारतानं सिंधुचं पाणी रोखलं तर पाकिस्तान आक्रमक विरोध करेल
- १३ ऑगस्ट २०२५
पाकचा पंतप्रधान शहबाज शरिफ
सिंधू करार स्थगित केला तर आम्ही असा धडा शिकवू जो तुम्ही विसरु शकणार नाही.
असं शहबाज शरीफांनी म्हटलं. ४८ तासांत पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी ३ पोकळ धमक्या भारताला दिल्या. पण तरीही पाकिस्तानला गोंजारणाऱ्या ट्रम्प यांनी चकार शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानात हाहाकार माजवल्यानंतर युद्ध थांबवा युद्ध थांबवा म्हणत पाकनं टाहो फोडला होता. आर्थिकदृष्या जर्जर झालेल्या कर्जबाजारी देशाला अवघ्या ३ महिन्यात इतकं बळ कसं आलं तर त्याचं एकमेव कारण अमेरिका.
अमेरिकेनं १ ऑगस्टला भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. त्यानंतर ६ ऑगस्टला भारतावर पुन्हा २५ टक्के टॅरिफ आणि दंडाची घोषणा केली. भारतावर अमेरिकेचा एकूण ५० टक्के टॅरिफ आहे. भारत रशियासोबत व्यवहार थांबवून आपल्या तालावर नाचत नाही हे लक्षात येताच ट्रम्प यांनी पाकिस्तानला दाणे टाकले. आणि भुट्टो, शरीफ आणि मुनीरसारख्या नेत्यांनी लगेच अमेरिकेच्या तालावर नाचायला सुरुवात केली.
पाकला गोंजारुन त्यांची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची तर ट्रम्पची योजना नाही ना? की वारंवार भारताला आण्विक हल्ल्यांची धमकी देणाऱ्या पाकच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका भारत चीन आणि रशिया या महासत्तेला आव्हान देणाऱ्या देशांवर लक्ष ठेवतेय... ? अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर इतकी बालीश भूमिका घेणाऱ्या पाकच्या नेत्यांना आता संयुक्त राष्ट्रांनीच सुनवायला हवं.भविष्यात पाकनं आणि त्यांच्या आकानी आपल्या कुटील कारवाया थांबवल्या नाही तर मात्र भारत पुन्हा एकदा शंख फुंकेल आणि मग पाकिस्तानला कुणीच वाली उरणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.