Nitin Gadkari 100 percent ethanol car launch : देशात वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑक्टोबरमध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली जाणार आहे. टोयोटा कंपनीची १००% इथेनॉलवर चालणारी 'इनोव्हा' (Innova Flex-Fuel) कार लॉन्च होईल. या कारला चालवण्यासाठी पेट्रोलची अजिबात गरज भासणार नाही, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
राजधानी दिल्लीमधील एक कार्यक्रमात ते बोलत होते. पेट्रोलच्या तुलतेन याची किंमत अतिशय स्वस्त असेल. इथेनॉलचा वापर केल्यामुळे ही कार चालवणे खूपच परवडणारे ठरेल, ज्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर २५ रुपये मिळाल्यासारखाच अनुभव येईल.
सरकारच्या ई२० इथेनॉल मिश्रण धोरणावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना गडकरींनी ही घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून या धोरणाचा वाहनांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामाबाबत संसदेत आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
१००% इथेनॉल कारचा गडकरींचा दावा
ऑक्टोबरमध्ये लाँच होणारी कार पूर्णपणे (१००%) इथेनॉलवर धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे तिला पेट्रोलची अजिबात गरज भासणार नाही. ही कार रस्त्यावर धावताना तब्बल ६०% वीज (Electricity) स्वतः निर्माण करेल, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
इथेनॉलच्या वापरामुळे ही कार चालवणे अत्यंत परवडणारे ठरेल. ग्राहकांना प्रति लिटर अवघ्या २५ रुपयांत पेट्रोल मिळाल्यासारखाच अनुभव येईल. जगातील तब्बल १९ देशांमध्ये इथेनॉलचा यशस्वी वापर केला जात आहे. भारतातही या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही, असेही ते म्हणाले.
E20 पेट्रोल आणि इंजिनच्या क्षमतेबाबत सरकारचे स्पष्टीकरण:
काही नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी E20 (२०% इथेनॉल मिश्रित) पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होणे आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर गडकरींनी स्पष्टीकरण दिले. वाहन उत्पादक कंपन्या (Automobile Companies), ऑटोमोबाईल असोसिएशन किंवा ग्राहक संघटनांकडून E20 च्या वापराने मायलेज किंवा इंजिन खराब झाल्याची कोणतीही मोठी तक्रार प्राप्त झालेली नाही, असे ते म्हणाले.
भारतातील अन्य 'फ्लेक्स-फ्यूल' (Flex-Fuel) गाड्या:
टोयोटाची ही १००% इथेनॉलवर चालणारी इनोव्हा देशातील पहिलीच गाडी नाही. यापूर्वी जून महिन्यात मारुती सुझुकीने देशातील पहिली 'फ्लेक्स-फ्यूल' पॅसेंजर कार लॉन्च केली होती. फ्लेक्स-फ्यूल गाड्या E20 पासून ते १००% शुद्ध इथेनॉलपर्यंत कोणत्याही मिश्रणावर चालण्यास सक्षम असतात. यामुळे इंधनाच्या उपलब्धतेनुसार चालकाला पर्याय निवडता येतो, असे गडकरी म्हणाले.
इथेनॉलच्या घोषणेसोबतच नितीन गडकरी यांनी देशात 'बाईक टॅक्सी' (Bike Taxi) सेवांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. ॲप-आधारित (App-based) प्लॅटफॉर्मचा वापर करून दुचाकी मालक कोणत्याही नवीन गुंतवणुकीशिवाय अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
देशातील सर्व राज्यांनी हे धोरण स्वीकारल्यास या माध्यमातून कोट्यवधी तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.