Karnataka Crime News : कर्नाटकातील म्हैसूर शहरात मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. ३९ वर्षीय व्यापाऱ्याने कौटुंबिक व आर्थिक ताणतणावातून ३७ वर्षीय पत्नीसह दोन मुलींची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. व्यापाराने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिलेली होती. मंगळवारी दुपारी ही घटना उघड झाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरजवळील हुन्सूर येथील ३९ वर्षीय व्यावसायिक हरीशा याने पत्नी ३७ वर्षीय निश्चिता आणि १४ वर्षीय निक्षिता व ८ वर्षीय रक्षा या दोन मुलीची हत्या करून राहत्या घरातच आत्महत्या केली. प्राथमिक तपासात थकीत कर्जाचा डोंगर आणि व्यवसायातील मोठे आर्थिक नुकसान या पाऊलामागे कारणीभूत असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण म्हैसूर शहरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
३९ वर्षाचा हरीशा हा सेकंडहँड गाड्या विकण्याचा व्यवसाय करत होता. त्याशिवाय स्थावर मालमत्तेच्या व्यवसायातही होता. मागील काही दिवसांपूर्वीच बँकांनी त्याच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. आत्महत्या करण्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आपली मालमत्ता, कर्जे आणि ओळखीच्या लोकांमध्ये संपत्ती वाटून घेण्याविषयी माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, हत्या आणि आत्महत्येमागील हेतू अद्याप कळलेला नाही. पत्नी आणि त्या जोडप्याच्या दोन मुली घरात पलंगावर झोपलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळल्या. त्या झोपेत असतानाच हरिशाने त्यांची हत्या केली असावी असा अंदाज आहे. पीडितांचे तोंड आणि नाक चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बायको आणि मुलींना ठार मारल्यानंतर, त्यानेही फाशी घेतल्याचा अंदाज आहे.
हरिशाच्या एका मैत्रिणीने केलेल्या फोनला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली. हुन्सूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या तपासासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.