कतारच्या तुरुंगात बंद असलेल्या 8 माजी भारतीय खलाशांना 28 डिसेंबर रोजी मोठा दिलासा देत येथील न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. दरम्यान, गुरुवारी 8 जणांना सुनावलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरुद्ध 60 दिवसांच्या आत याचिका करता येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "कतारच्या न्यायालयाने 28 डिसेंबर रोजी या 8 जणांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आमच्या कायदेशीर टीमकडे न्यायालयाचा आदेश आहे. हा गोपनीय आदेश आहे. आठही जणांना वेगवेगळ्या कालावधीसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ते पुढे म्हणाले, “फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. आमच्याकडे 60 दिवसांचा वेळ आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायालय, द कोर्ट ऑफ कॅसेशनकडे जाऊ शकतो. कायदेशीर पथक या प्रकरणावर काम करत आहे. आम्ही कायदेशीर टीम आणि पीडित कुटुंबाच्या संपर्कात आहोत.'' (Latest Marathi News)
28 डिसेंबर रोजी 8 माजी भारतीय नौसैनिकांना दिलेल्या मदतीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहोत. मंत्रालयाने म्हटले होते की, “आमचे राजदूत आणि इतर अधिकारी कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू.”
दरम्यान, कतार येथील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या आठ भारतीयांना ऑगस्टमध्ये कथित हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 ऑक्टोबरला या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र कतारने या आरोपांबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.