व्ही. डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
२० मंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने एकत्र शपथ घेत इतिहास रचला
६० वर्षांनंतर अशी घटना घडली
नव्या सरकारकडून विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त
केरळच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी आपले नाव कोरले आहे. व्ही. डी. सतीशन यांनी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सतीशन यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर वीस मंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली.
सतीशन यांच्या मते, गेल्या ६० वर्षांत प्रथमच केरळमधील संपूर्ण मंत्रिमंडळ एकत्र शपथ घेणार आहे. इतिहासात यापूर्वी १९६२ साली आर. शंकर (R. Sankar) यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह शपथ घेतली होती. मात्र, १९६४ मध्ये त्यांचे सरकार कोसळले होते. त्यामुळे सध्याचा हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली. तसेच काँग्रेसचे विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. मात्र, शशी थरूर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. ते सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे असून, कार्यक्रमापूर्वी त्यांनी सतीशन यांची भेट घेतली होती.
नव्या मंत्रिमंडळात १४ आमदार प्रथमच मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. यामध्ये सी.पी. जॉन, एन. शमसुद्दीन, के.एम. शाजी, पी.के. बशीर, व्ही.ई. अब्दुल गफूर, पी.सी. विष्णुनाथ, रोजी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दीकी, के.ए. थुलसी आणि ओ.जे. जनीश यांचा समावेश आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी तिरुवनचूर राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी शनिमोल उस्मान यांची निवड करण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. एकूणच, सतीशन यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून राज्याच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, येणारा काळ या सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.