बिहारमध्ये एनडीएचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत आहे. निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री झाल्याने राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला होता, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार केल्यानंतर JDU भाजपमध्ये विलीन होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. अशातच मंगळवारी समोर आलेल्या एका फोटोमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला जेडीयूचे नेते आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेतील फोटो समोर आल्यानंतर बिहारमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. आरजेडीच्या RJD प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी पत्रकार परिषदेचा फोटो शेअर करत भाजप आणि जेडीयूला डिवचले. जेडीयू आता कधीही भाजपमध्ये विलीन होण्याची घोषणा करू शकते. समाजवाद विकता विकता सांप्रदायिकतेच्या दुकानात सेल्समन बनून बसले आहेत, अशा शेलक्या शब्दात प्रियंका भारती यांनी टीका केली.
तर दुसरीकडे बिहार काँग्रेसचे प्रवक्ते स्नेहाशीष वर्धन यांनीही या मुद्यावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने आपल्या आघाडीतील मित्रपक्षांमध्येही स्लीपर सेल तयार केले असून, हे लोक वेळोवेळी कठपुतळीसारखे काम करतात असा घणाघात त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, जेडीयूमध्ये कधीही फुट पडू शकते. भाजप प्रत्येक राज्यात आपल्या मित्रपक्षांना संपवते हा जुना इतिहास आहे. त्यामुळे उद्या जेडीयू भाजपमध्ये जर विलीन झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असा टोला त्यांनी लगावला.
भाजपला प्रादेशिक पक्षांना वाढू द्यायचं नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, ललन सिंह यांचा भाजप मुख्यालयातील उपस्थितीवरून जेडीयूच्या भाजपमधील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.