

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप
नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना 20 ते 30 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर
केंद्र सरकार आणि भाजपला ओमर अब्दुल्लांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीनंतर आणखी एका राज्यातील राजकीय पक्षात भाजप सुरूंग लावण्याच्या तयारीत आहे. ते राज्य म्हणजे जम्मू-काश्मीर तेथील आमदारांना थेट ३० कोटी रुपयांची ऑफर दिली जातेय, असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आरोप केला की, पक्षांतर करण्यासाठी भाजपतर्फे नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना २० ते ३० कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देण्याची ऑफर देण्यात आली होती.
तसेच, "आमचा संयम आणि सभ्यता यांची परीक्षा घेऊ नका," असा इशाराही ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकार आणि भाजपला दिलाय. ओमर अब्दुला हे श्रीनगरमधील हजरतबल येथे आयोजित 'मादर-ए-मेहरबान' दिन रॅलीत पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी भाजपला गंभीर इशारा दिलाय. नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट पाडण्याचा आणखी एक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओमर यांनी केला. भाजपचा पैशाची ऑफर देण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर आता आमच्या पक्षातील आमदारांना बंद खोलीत नेऊन त्यांना कोट्यवधी रुपये देण्याची ऑफर देत आहात.
इतकेच नाही तर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ अशी ऑफर देत आहात, असे ओमर अब्दुला म्हणालेत. भाजप कशाप्रकारे आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती पक्षातील एका आमदाराने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातील एक वकील, जे भाजपचे पदाधिकारीही आहेत, त्यांनी जम्मूतील आपल्या एका आमदाराशी संपर्क साधला होता, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
"जर तुम्ही आमच्यात सामील झालात, तर आम्ही तुम्हाला २०-३० कोटी रुपये, एक मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देऊ," असे आमदारांना सांगण्यात आले होते. या गोष्टीला अल्लाह सुद्धा साक्षीला आहे. कार्यक्रमावेळी बोलातना मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी भाजपला इशारा दिला. म्हणाले की, भाजला वाटते की या लोकांची निष्ठा खूप स्वस्त आहे.
भाजपला आव्हान देत ओमर म्हणाले, "या मंचाकडे पाहून घ्या इथे असा कोणीही दिसणार नाही जो २० कोटी किंवा अगदी १०० कोटी रुपयांसाठी आपली निष्ठा विकायला तयार असेन." ते पुढे म्हणाले, "आपल्याला सर्वांनाच माहित आहे की, 'बाबा-ए-कौम' शेख मोहम्मद अब्दुल्ला, 'माद्रे मेहरबान' आणि फारुख अब्दुल्ला यांनी मला हेच शिकवले आहे की, या जगात आपल्या कृत्यांचे उत्तर द्यावे लागो वा न लागो, पण एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला अल्लाहसमोर उत्तर द्यावेच लागेल."
तसेच भाजपनं आपल्याला कमकूवत समजू नये. ते मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मागच्या दाराने येऊन ते पुढच्या सीटवर बसू शकणार नाहीत. सध्या तरी जनतेने त्यांना मागेच ठेवले आहे आणि तुम्ही मागेच राहाल,असेही ओमर अब्दुला म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.