

क्रिकेट सामना सुरू असताना मधमाशांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यात ६५ वर्षीय पंचांचा (अंपायर) मृत्यू झाला. माणिक गुप्ता असं मृत्यू झालेल्या पंचांचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात इतर १५ ते २० खेळाडू जखमी झाले आहेत.
उन्नाव जिल्ह्यातील शुक्लागंज परिसरातील सप्री मैदानावर क्रिकेटचे सामने सुरू होते. सामना सुरू असताना अचानक मधमाशांनी तुफान हल्ला चढवला. कानपूर क्रिकेट असोसिएशनचे पंच माणिक गुप्ता या सामन्यात पंच होते. ड्रिंक्स ब्रेक घेतल्यानंतर सर्व खेळाडू पाणी पित असताना मधमाशांनी हल्ला चढवला. यातून बचाव करण्यासाठी खेळाडूंसह पंचही मैदानात झोपले. मधमाशांच्या हल्ल्यामुळं मैदानात काही वेळ गोंधळ उडाला होता.
मधमाशांनी हल्ला केल्यानं पंच गुप्ता हे जखमी झाले. त्यांना कानपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून अन्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सामन्याचा दुसरा डाव सुरू होता. खेळाडूंनी ड्रिंक्स ब्रेक घेतला. सर्व खेळाडू पाणी पित असतानाच मधमाशांनी हल्ला केला. त्यातून बचाव करण्यासाठी सर्व खेळाडू मैदानावर झोपले. काही खेळाडू आणि पंचांना मधमाशांनी दंश केला. पंच जखमी झाले. पंचांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं प्रथमोपचार करून करण्यात आले. पण प्रकृती गंभीर झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
२०१९ मध्येही अशीच एक घटना तिरुवअनंतपुरमध्ये घडली होती. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात वनडे सामना सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.