Extramarital Affair : अमेरिकेत बक्कळ पगाराची नोकरी करणाऱ्या भारतीय इंजिनिअरने पत्नीची निर्घृण हत्या केली. विवाहबाह्य संबंधातून टेक इंजिनिअरने पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे फोटो भारतामधील गर्लफ्रेंडला पाठवल्याचे तपासातून उघड झालेय. अमेरिकन पोलिसांनी टेक इंजिनिअरला बेड्या ठोकल्या आहेत. ९ महिन्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली आहे. अविनाश नार्ने असे आरोपी पतीचे नाव आहे. तर राजिता सब्बिनेनी असे मृत पत्नीचे नाव आहे.
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी सब्बिनेनीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळला होता. अविनाशने पत्नीची हत्या केली अन् आत्महत्या झाल्याचे चित्र तयार केले होते. पण पोलिसांच्या तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. बेलव्ह्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश नार्नेने याने ९ महिन्यापूर्वी पत्नी राजिता सब्बिनेनीचा (२७) गळा दाबून खून केला होता. त्यानंतर नार्नेने पोलिसांना फोन करून पत्नी बाथरूममध्ये अडकली आहे आणि बाहेर येत नाहीये असे कळवले. पण पोलिसांनी बाथरूमचे दार तोडले, तेव्हा त्यांना सब्बिननी जमिनीवर पडलेली आढळली. अधिकाऱ्यांनी तिला घटनास्थळीच मृत घोषित केले.
चौकशीदरम्यान, नार्नेने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, तो २७ ऑक्टोबर रोजी काही कामासाठी अपार्टमेंटमधून बाहेर गेला होता. सुमारे ४० मिनिटांनंतर तो घरी परतला तेव्हा त्याला सब्बिनेनी बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतल्याचे आढळले. मात्र, नार्ने बाहेर असताना त्यांच्या घरात इतर कोणीही प्रवेश केल्याचे अधिकाऱ्यांना आढळले नाही. दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सब्बिनेनीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याने झालेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली.
नार्नेचे भारतातील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले. ते दोघे एकत्र असतानाच ५ जून २०२५ रोजी नार्नेने सब्बिनेनीसोबत ठरवून लग्न केले. त्याची प्रेयसीसुद्धा त्याच्या लग्नाला उपस्थित होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, नार्नेचे सब्बिनेनीशी लग्न झाल्यानंतरही दोघेंचे प्रेमसंबंध सुरूच होते.
गुन्ह्याच्या दिवशी नार्नेने प्रेयसीला चार ते पाच वेळा फोन केला होता. त्याने पत्नीच्या मृतदेहाचा फोटोही त्याच्या प्रेयसीला पाठवला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ५ जुलै २०२६ रोजी नार्नेवर हत्येचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.